डॉ. स्वाती मणेरकर, बालरोगतज्ज्ञ, लो. टिळक रुग्णालय, शीव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील ‘स्नेह अमृत कक्ष’ या मानवी दूधपेढीला ‘सर्वोत्कृष्ट दूधपेढी’चा पुरस्कार हैदराबाद येथील परिषदेत प्राप्त झाला. नवजात बालकांचे मृत्यू रोखण्याच्या उद्देशातून २९ नोव्हेंबर १९८९ रोजी स्थापन झालेल्या या पेढीला या वर्षी ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मानवी दूधपेढीचे महत्त्व आणि कार्य समजून घेण्यासाठी लो. टिळक रुग्णालयातील नवजात बालकांच्या तज्ज्ञ डॉ. स्वाती मणेरकर यांच्याशी साधलेला हा संवाद.

* मानवी दूधपेढी म्हणजे काय?

मुदतपूर्व जन्माला आलेल्या काही बालकांचे वजन कमी असते किंवा जन्मत: आजारी असणाऱ्या बालकांना आईचे दूध दिल्यास त्यांची प्रकृती लवकर सुधारते. परंतु काही वेळा प्रसूती झाल्यावर लगेचच मातांना दूध येत नाही किंवा आई आजारी असल्यामुळे दूध पाजू शकत नाही, अशा स्थितीत बालकांना पावडरचे किंवा बाहेरील दूध देण्याऐवजी  दुसऱ्या मातेचे दूध देणे केव्हाही उत्तम! इथे स्तनपान करणाऱ्या माता अतिरिक्त दूध दान करतात आणि हे दूध गरज असलेल्या रुग्णालयातील बालकांना पाजले जाते. मुंबईत सध्या सात मानवी दूधपेढय़ा आहेत.

* कोणत्या माता दूधदान करू शकतात?

स्तनपान करणारी कोणतीही सुदृढ माता आपले दूध या पेढीमध्ये देऊ शकते. एचआयव्हीबाधित, हेपेटाईटीस बी असे काही आजार असलेल्या मातांचे दूध घेतले जात नाही. दूध देऊ इच्छिणाऱ्या मातेच्या एचआयव्ही, हेपेटाईटीस, क्षयरोग अशा चाचण्या केल्या जातात. त्यानंतरच दूध संकलित केले जाते.

* आपल्याला दूध पुरेसे आहे का हे मातेला कसे समजणार?

अनेकदा दूध पिळूनही बाहेर येत नाही. तेव्हा मातांना आपल्याला दूध पुरेसे नाही असा समज होतो. स्तनपान करणाऱ्या ९५ टक्के मातांमध्ये जितके दूध शरीरातून काढेल किंवा तिच्या बाळाला देईल तितके जास्त दूध तिच्या स्तनांमध्ये निर्माण होत असते. त्यामुळे माझे दूध बाळाला पुरत नाही, तर मी दान कसे करणार, असा गैरसमज मातांनी करून घेऊ नये. स्तनामधून दूध पिळून काढणे ही एक कला आहे. ती आम्ही शिकवितो, त्यानंतर सहजपणे दूध काढता येते. प्रत्येक मातेने ही कला शिकून घेणे गरजेचे आहे, कारण केवळ दान करण्यासाठीच नव्हे तर कामानिमित्त आई काही काळ बाहेर गेल्यास अशा रीतीने दूध काढून त्याचे योग्य जतन करून बाळाला देता येते.

* पेढीमध्ये दूध कसे साठविले जाते?

संकलित केलेले दूध बालकाला देण्यास सुरक्षित आहे का, अन्य जंतुसंसर्ग झाला आहे का, याची खात्री करण्यासाठी याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. हे दूध पाश्चराईज्ड केले जाते. त्यानंतर पुन्हा याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. या तपासण्यांमध्ये दूध साठवणुकीसाठी योग्य असल्याची खात्री झाल्यावर उणे २० अंश सेल्सिअसखाली दूध जतन केले जाते. हे दूध सहा महिने जतन करता येते. परंतु आमच्याकडे दुधाची मागणीच इतकी असते की, ते फार काळ जतन करून ठेवण्याची वेळ येत नाही.

* पेढीतील दुधाचा वापर कसा केला जातो?

मुदतपूर्व जन्माला आलेल्या आणि जन्मत: काही आजार असलेल्या बालकांची प्रतिकारशक्ती फार कमी असते. अतिदक्षता विभागात असणाऱ्या बालकांना त्यांच्या आईचे दूध नसल्यास प्राधान्याने पेढीतील दूध दिले जाते. बालकांच्या प्रकृतीनुसार दूध कोणाला द्यावे याचा क्रम ठरविला जातो. मातेने तिचे दूध बालकाला पाजावे यावरच आमचा भर अधिक असतो. अगदी अतिदक्षता विभागातही आम्ही मातेला दूध पिळून काढून वेळोवेळी देण्यास सांगतो आणि तेच दूध बालकाला दिले जाते. मातेचे दूध नसल्यास पेढीतील दूध दिले जाते. जन्मलेल्या बालकाला पहिल्यांदातरी मातेचे दूध दिले जाते. ज्या बालकांना ते उपलब्ध होत नाही, तेथे पेढीतील दूध वापरले जाते.

* दूध संकलन किती होते?

वर्षांला पेढीमध्ये सुमारे अठराशे ते दोन हजार लिटर दूध संकलित केले जाते. दूध जास्तीत जास्त संकलित होण्यापेक्षाही मातेला तिच्या बाळाला दूध कसे पाजता येईल यावर आमचा अधिक भर असतो. कारण माता आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये  स्तनपानाबाबत अनेक गैरसमज असतात. हे गैरसमज दूर करून मातेने तिच्या बाळाला दूध दिले तर पेढीची गरज फारशी भासणार नाही. 

* करोनाकाळात दूधपेढीचे कामकाज कसे सुरू होते?

करोनाकाळातही दूधपेढी कार्यरत होती. या काळातही अतिदक्षता विभागातील ज्या बालकांना आईचे दूध उपलब्ध होऊ शकत नव्हते अशा बालकांना पेढीचे दूध दिले गेले. जास्तीत जास्त दूध संकलन रुग्णालयात प्रसूती होणाऱ्या मातांच्या माध्यमातून होते. या काळात रुग्णालयात प्रसूती कमी प्रमाणात झाल्यामुळे दूध संकलन फारसे होऊ शकले नाही. करोनाच्या आधी पेढीमध्ये ३५ लिटर दूध संकलित केल्यामुळे अडचण जाणवली नाही.

* मानवी दूधपेढय़ांचा विस्तार होणे गरजेचे आहे का?

नवजात बालकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी आईचे दूध पाजणे सर्वात उत्तम पर्याय असून यामुळे जगभरात वर्षांला सुमारे दहा लाख बालकांचे मृत्यू रोखता येतील. त्यामुळे आईचे दूध मिळू न शकणाऱ्या बालकांपर्यंत या पेढय़ा पोहचणे आवश्यक आहे. मोठय़ा रुग्णालयांमध्ये जिथे नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आहेत, तेथे दूधपेढय़ा सुरू होणे गरजेचे आहे. राज्यात अकोला, नागपूर येथे लवकरच मानवी दूधपेढय़ा सुरू होणार आहेत.

मुलाखत : शैलजा तिवले