मुंबई : सकाळ – सायंकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी फलाटांवरील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जलदगतीने कामे होत असून नोव्हेंबरअखेरीस हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामामुळे एकाच वेळी सध्याच्या तुलनेत ५० टक्के अधिक प्रवासी फलाटांवर उभे राहू शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या सतत वाढत असून, प्रवाशांना उभे राहण्यास, रहदारीसाठी जागा अपुरी पडू लागली आहे. प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेने अनेक कामे हाती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच फलाटांचे विस्तारीकरण प्राधान्याने केले जात आहे. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक १ आणि २ वर अप आणि डाऊन लोकल थांबा घेत होत्या. या फलाटाची रुंदी अपुरी असल्याने प्रवाशांची कोंडी होत होती. सुरक्षा जवानांनाकडून गर्दीचे नियोजन केल्यानंतरही फलाटांवरील गर्दी आटोक्याबाहेर जात होती. त्यामुळे दादरवरील फलाट क्रमांक २ वरून डाऊन दिशेने जाणारा मार्ग बंद केला. तर दादरवरून सुटणाऱ्या लोकल परळपर्यंत चालवून डाऊन दिशेने जाऊ लागल्या.

हेही वाचा >>>मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फलाटांवर मोकळीक

सध्या फलाट क्रमांक १ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या फलाटांची रुंदी ७ मीटरवरून १०.५ मीटर करण्यात येत आहे. फलाट क्रमांक १ चे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित कामे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे प्रवाशांना गर्दीमुक्त प्रवास करणे शक्य होईल. तसेच, एकाच वेळी सध्याच्या प्रवाशांच्या तुलनेने ५० टक्क्यांनी अधिक प्रवासी फलाटावर उभे राहू शकतील, असा विश्वास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>अमेरिकन डॉलर्स तस्करीप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक; दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन जप्त

दादरचा फलाट क्रमांक २ काळाच्या पडद्याआड

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकाचे नाव एकच असले तरी फलाटांचा क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांचा गोंधळ होतो. काही वेळा प्रवाशांच्या लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या चुकतात. त्यामुळे उपाययोजना म्हणून पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक १ ते ७ कायम राहतील. तर मध्य रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील दादर स्थानकातील फलाटांच्या क्रमांकात बदल करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक १ हा फलाट क्रमांक ८ म्हणून घोषित केला जाईल. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांक २ ची रूंदी वाढवण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे त्याचे अस्तित्वात राहणार नाही. म्हणून हे फलाट वगळण्यात आले आहे. मध्य रेल्वेचा फलाट क्रमांक ३ हा फलाट क्रमांक ९ म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलाट क्रमांक ४ हा फलाट क्रमांक १०, फलाट क्रमांक ५ हा फलाट क्रमांक ११, फलाट क्रमांक ६ हा फलाट क्रमांक १२, फलाट क्रमांक ७ हा फलाट क्रमांक १३, फलाट क्रमांक ८ हा फलाट क्रमांक १४ म्हणून घोषित केला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion of dadar station platforms on central railway is underway mumbai amy