‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची मुंबई विभागीय अंतिम फेरी उत्साहात
पाच महाविद्यालये, पाच एकांकिका आणि लाखमोलाचा उत्साह अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शनिवारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ मुंबई विभागाची अंतिम फे री रंगली. एकूण १७ एकांकिकांमधून निवडून आलेल्या पाच एकांकिकांमध्ये शनिवारी पाल्र्यातील मा. दीनानाथ नाटय़गृहामध्ये अंतिम फेरीसाठी चुरस होती. पाच महाविद्यालयांनी सादर केलेल्या एकांकिकांमधून परीक्षकांनी महाअंतिम फेरीसाठी म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘एक्स-प्रीमेंट’ एकांकिकेची निवड केली.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’चे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्त्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रावर होत आहे. तसेच स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत.
‘लोक सत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागाच्या अंतिम फेरीसाठी ‘एक्स-प्रीमेंट’ (म.ल.डहाणूकर महाविद्यालय), ‘सुशेगात’(रुईया महाविद्यालय), ‘अर्बन’ (साठय़े महाविद्यालय), ‘लछमी’ (कीर्ती महाविद्यालय), ‘शिकस्ते इश्क’ (के. जे. सोमय्या महाविद्यालय) या पाच एकांकिकांची निवड झाली होती. दोन धर्माच्या लोकांच्या कडव्या भावना, त्यातून होणारी तेढ हा विषय जसा आजच्या विद्यार्थ्यांना जाणवतो, कळतो. त्याचप्रकारे रुढी-परंपरा, सामाजिक चौकटींमध्ये अजूनही अडकून पडलेल्या स्त्रीची कु चंबणा, स्वत:ला व्यक्त करण्यासाठीची तिची धडपडही त्यांना समजते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबरोबरच आपल्यापासून कोसो दूर असलेल्या आणि आपल्यासाठी लढणाऱ्या सीमेवरील सैनिकांचा रोजच्या जगण्यातला संघर्ष, त्यांच्या कुटुंबाची होणारी मानसिक घालमेल असे विषय एकांकिकांच्या माध्यमांतून मांडणाऱ्या या विद्यार्थ्यांंनी आपले विचार हे आपल्या जगण्यापुरते मर्यादित नाहीत, याची चुणूक दाखवून दिली. परीक्षक म्हणून डॉ. अनिल बांदिवडेकर, मिलिंद फाटक आणि अरविंद औंधे यांनी पार पाडली. तर आयरिस प्रॉडक्शनच्या प्रतिनिधी म्हणून अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यावेळी उपस्थित होत्या.
स्पर्धकांचा जल्लोष
पारितोषिक जाहीर करण्याच्या वेळी तर या स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. म. ल. डहाणूकर, रामनारायण रुईया या महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी घोषणा देतच पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात केली. त्यानंतर जसजशी पारितोषिके जाहीर होत गेली, तसतसा या महाविद्यालयांतील स्पर्धकांनी जल्लोष सुरू केला. इतरांच्या एकांकिकांना पारितोषिक मिळाल्यानंतरही टाळ्या वाजवत खिलाडूवृत्तीचे प्रदर्शनही स्पर्धकांनी केले.
विजेत्यांच्या प्रतिक्रिया
माझं हे पहिलेच पारितोषिक आहे. एवढय़ा मोठय़ा व्यासपीठावर हे पारितोषिक मिळाले म्हणून खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया सवरेत्कृष्ट लेखक ठरलेल्या भावेश सुर्ते (एक्स-प्रीमेंट, म. ल. डहाणूकर महाविद्यालय) याने व्यक्त केली. तर सातत्याने मेहनत केली याचे कुठेतरी फळ मिळते. मात्र महाअंतिम फेरी अजून बाकी असल्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या एकांकिकेतील सवरेत्कृष्ट अभिनेत्याला टक्कर देण्यासाठी तयारी करायची असल्याचे मत सवरेत्कृष्ट अभिनेता ठरलेल्या कुणाल शुक्ल (एक्स-प्रीमेंट, म. ल. डहाणूकर महाविद्यालय) याने व्यक्त केले.
ठाणे विभागाची
अंतिम फेरी आज
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतील ठाणे विभागाची अंतिम फेरी आज, रविवारी दुपारी ३ वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे. प्राथमिक फेरीतून निवडून आलेल्या चार एकांकिका या अंतिम फेरीत दाखल झाल्या असून त्यात ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘मित्तर’, डोंबिवलीमधील व्ही. के. पेंढरकर महाविद्यालयाची ‘भुतके’, नेरूळच्या डी. वाय. पाटील वास्तूविशारद महाविद्यालयाची ‘ट्रायल बाय मीडिया’ आणि विरारमधील विवा महाविद्यालयाची ‘वी द पीपल’ या एकांकिकांचा समावेश आहे. या चारमधून एक एकांकिका महाअंतिम फेरीत जाणार आहे.
ही स्पर्धा म्हणजे उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी साध्या सोपे सादरीकरण करण्याकडे भर द्यावा. उगाचच तांत्रिक गोष्टींमध्ये अडकू नये. या गोष्टी केवळ पूरक असतात. यामुळे एकांकिका सादर करताना लेखन हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्याकडे अधिक भर द्यावा.
– मिलिंद फाटक, परीक्षक
—
टॅलेंट सर्च आणि लोकांकिका यांचे अतूट नाते आहे. आजच्या महाविद्यालयीन रंगभूमीचा क्रॉस सेक्शन घ्यायचा असेल तर लोकांकिका हा पर्याय आहे. रंगभूमीला नवा आयाम आणि एक सळसळते व्यासपीठ म्हणून लोकांकिका स्पध्रेनिमित्त बहाल केले आहे. त्याचा फायदा व उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा.
– डॉ. अनिल बांदिवडेकर, परीक्षक
—
परीक्षण करताना खूप आनंद मिळाला. स्पध्रेत सहभागी कलाकार तसेच एकांकिकांचा दर्जाही चांगला होता. एकांकिकांमध्ये वैविध्य होते. तसेच अभिनयाचा दर्जाही चांगला होता. आजची पिढीही खोलवर विचार करते हे या स्पध्रेतून जाणवले.
– अरविंद औंधे, परीक्षक
—
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा हे एक मोठे व्यासपीठ आहे. आतली तळमळ व्यक्त करण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. प्रचंड उर्जा आणि त्यात प्रेक्षकांची मिळणारी कौतुकाची थाप यामुळे उदयोनमुख कलावंताचे सोने होते. आयरिस सारखे प्रॉडक्शनही या कलावंतांच्या पाठीशी उभे राहते.
– अविनाश नारकर, आयरिस प्रॉडक्शनचे प्रतिनिधी
–
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आपली कल्पकता सादर करतात. अशा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमधील उर्जेला एक विधायक वळण मिळते.
– ऐश्वर्या नारकर, आयरिस प्रॉडक्शनच्या प्रतिनिधी