मुंबई : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेत आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्याबरोबरच शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ज्ञ समितीने केली आहे. पुढील १५ दिवसांत राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार असून यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
हेही वाचा >>> मुंबई : मोटरगाडीच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे जखमी
महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण २०१० नंतर प्रथमच जाहीर होणार आहे. धोरण ठरविण्यासाठी कार्याध्यक्ष विनय सहस्राबुद्धे यांच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’ने स्मारकांसाठी सुचविलेल्या शिफारशीमध्ये पुतळ्यासंदर्भातील निकषांवर प्रकाश टाकला आहे. शासनाकडून परिसराचा विचार करता पुतळ्याची उंची किती असावी याबाबत काही नियम ठरवणे आवश्यक आहे, पुतळ्याच्या कलात्मकतेबाबत निकष ठरविण्यात यावेत. शिल्पाच्या परीक्षणासाठी केवळ शासकीय कलाशिक्षण संस्थेतील शासकीय अधिकारी शिक्षक न ठेवता त्यासोबतच एखाद्या तज्ज्ञाची नेमणूक करावी. पुतळ्याला हार घालण्यासाठी काही ठिकाणी लोखंडी शिड्या उभारण्यात आल्या असून त्यामुळे सौंदर्याला बाधा येत असल्याचे समितीने म्हटले आहे. सांस्कृतिक धोरण ठरविताना १० उपसमित्या नेमण्यात आल्या असून त्यात कारागिरी, भाषा, साहित्य आणि ग्रंथव्यवहार व वाचनसंस्कृती, दृश्यकला, गडकिल्ले आणि पुरातत्व, लोककला, संगीत, रंगभूमी, नृत्य, चित्रपट, भक्तिसंस्कृती यांचा समावेश होता.
हेही वाचा >>> मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
पुतळ्यांसंदर्भातील अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आला असून त्यानुसार शिफारशींवर विचार करून अंतिम धोरण तयार होईल. धोरण जाहीर झाल्यानंतर १०-१० वर्षे धोरणाची अंमलबजावणी होत नाही. मात्र सांस्कृतिक धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी वेगळी समिती नेमली जाईल. – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
सांस्कृतिक धोरण ठरवताना भौगोलिक, सामाजिक, भाषा अशा सर्वच घटकांचा विचार करून ते सर्वसमावेशक होईल हे काटेकोरपणे पाहण्यात आले. धोरणापलीकडची दृष्टी समोर ठेवताना तरुण कलाकार निराधार होणार नाहीत, त्यांना प्रोत्साहन मिळेल हे पाहण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून हे धोरण तयार झाले आहे. – विनय सहस्त्रबुद्धे, सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष
© The Indian Express (P) Ltd