मुंबई : दहावी-बारावीच्या निकालानंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम असतो. तसेच विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबतही अनेक जण अनभिज्ञ असतात. कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्याकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या, याबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.माटुंगा पश्चिमेकडील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या २५ व २६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होईल.
अभ्यासक्रमाची निवड कशी करावी आणि विद्यार्थ्यांच्या आवडीच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांत कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, विज्ञान, वाणिज्य, कला, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, वैद्याकीय, वैद्याकीयपूरक अभ्यासक्रम, विविध पदविका अभ्यासक्रम, कौशल्य विकास, विधि अशा विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रम, त्यांची प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा, नामांकित महाविद्यालये, भविष्यातील रोजगार संधी यांबाबत विवेक वेलणकर हे मार्गदर्शन करतील.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीची दिशा स्पष्ट व्हावी, याकरिता ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. ताणतणावाला सामोरे कसे जावे याबाबत डॉ. हरीश शेट्टी व डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. नव्या वाटा या सत्रांतर्गत यूट्यूब – समाजमाध्यमे या विषयावर सुकीर्त गुमास्ते, वित्त क्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर या कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींचा मागोवा घेतील. परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन मार्गदर्शन करतील.ऑनलाइनसह प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क हे अवघे ५० रुपये आहे.
हेही वाचा >>>घाटकोपर, भांडुप व मुलुंडमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या प्रवेशिका ऑनलाइनसह प्रत्यक्ष पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दादर पश्चिमेकडील छबिलदास मार्गावरील ७, अब्बास मॅन्शन, फॅमिली स्टोअर येथे सकाळी ९.३० ते १.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध असतील.
२५ व २६ मे रोजी चालणाऱ्या या कार्यशाळेतील कोणत्याही एका दिवसाची निवड विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार करू शकतात. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी
कधी ? शनिवार, २५ मे आणि रविवार, २६ मे रोजी
कुठे? दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्य मंदिराच्या मागे, माटुंगा (पश्चिम)
केव्हा? सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या
http://tiny.cc/LS_MargYashacha_25May
http://tiny.cc/LS_MargYashacha_26May