‘बालभारती’च्या नव्या पायंडय़ाला तज्ज्ञांचा आक्षेप
रसिका मुळ्ये, मुंबई</strong>
पाठय़पुस्तकांचे श्रेय शिक्षण मंत्र्यांच्या ‘विशेष कार्य अधिकाऱ्यां’ना (ओएसडी) देण्याचा नवा पायंडा ‘बालभारती’ने पाडला असून पुढील वर्षीपासून लागू होणाऱ्या पाठय़पुस्तकांवरच नाही तर गेल्या चार वर्षांत तयार झालेल्या बालभारतीच्या सर्वच पाठय़पुस्तकांवर शिक्षणमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे यांचे नाव ‘मुख्य समन्वयक’ म्हणून छापण्यात येणार आहे. यावर अभ्यास मंडळातील तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे.
कलचाचणीच्या निकाल, अध्ययन निष्पत्तीची पत्रके यांवर मंत्रीगणांची छायाचित्रे छापण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरल्यानंतर आता शिक्षण मंत्र्याच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांची वर्णी पाठय़पुस्तकांच्या श्रेयनामावलीत लागल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांनुसार त्यांना विशेष कार्य अधिकारी नेमता येतात. मंत्र्यांना योग्य वाटतील अशा व्यक्तींची नियुक्ती केली जाते. त्यासाठी कोणतेही अनुभव, शैक्षणिक स्तरावरील पात्रता निकष नाहीत. त्यासाठी खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहाय्यक अशा पदांचा आधार घेऊन साधारणपणे गोतावळ्यातील व्यक्तींची नियुक्ती केली जाते. मंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांनी काम करणे अपेक्षित असते. शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्राची साठे यांची शालेय शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता एक पाऊल पुढे जात त्यांची पाठय़पुस्तक मंडळाच्या मुख्य समन्वयक म्हणूनच वर्णी लावण्यात आली आहे.
बालभारतीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी या श्रेयदानाला मंजुरी देत संस्थेच्या बैठकीत याबाबतचा ठराव संमत केला. पुढील वर्षी नव्याने लागू करण्यात येणाऱ्या दुसरी आणि अकरावीच्या पुस्तकांबरोबरच गेल्या चार वर्षांत बदलण्यात आलेल्या पुस्तकांचे श्रेयही त्यांना देण्यात येणार आहे. अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी मात्र यावर आक्षेप नोंदवला आहे.
‘भाषा विषयांच्या पुस्तक निर्मितीमध्ये अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात लक्ष घातले होते. मात्र इतर अनेक विषयांच्या कामकाजात त्यांचा सहभाग नव्हता. असे असताना मंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना श्रेय का द्यावे’ असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे.
नेमके प्रकरण काय?
आतापर्यंत पाठय़पुस्तकांवरील श्रेयनामावलीत विषय तज्ज्ञ, अभ्यास मंडळातील सदस्य, बालभारतीचे विषय अधिकारी, प्रकाशक, निर्माते, चित्रकार यांची नावे देण्यात येत होती. यापूर्वी शिक्षण विभागाचे सचिव, आयुक्त किंवा मंत्र्यांचे नाव पुस्तकावर छापले जात नव्हते. मात्र आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विभागात शालेय शिक्षणासाठी विशेष कार्य अधिकारी प्राची साठे यांचे नाव ‘मुख्य समन्वयक’ म्हणून पाठय़पुस्तकांवर छापण्यात येणार आहे.
मी पंधरा वर्षे शिक्षिका म्हणून काम करत असताना केलेले संशोधन, अनुभव या आधारे मला पाठय़पुस्तकांमध्ये बदल करावेसे वाटले. त्यासाठी मी कष्ट केले. माझ्या संकल्पनेतून ही पुस्तके तयार झाली, त्याचे श्रेय मला द्यावे असे अभ्यास मंडळाचे सदस्य आणि विषय अध्यक्षांना वाटले. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी श्रेयासाठी काम केले नाही किंवा नामोल्लेखाची मागणी केली नाही. विशेष कार्य अधिकारी म्हणून माझे नाव देण्यात आलेले नाही. विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचा मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपयोग केला.
– प्राची साठे, विशेष कार्य अधिकारी