मुंबई : दशकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने नाट्यवर्तुळात एक नवा मापदंड निर्माण केला आहे. युवा रंगकर्मींना त्यांच्यातील सर्जनशीलता दाखवण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यापलीकडे करिअरच्या नव्या वाटा, जुन्याजाणत्या रंगकर्मींचे मार्गदर्शन असे बरेच काही देऊ पाहणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. स्पर्धेआधी महाविद्यालयीन तरुणाईला रंगमंचीय आविष्काराचे विविध पैलू अनुभवी रंगकर्मींकडून जाणून घेण्याची संधी देणाऱ्या ‘रंगसंवाद’ या खास वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नवव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली असून सध्या राज्यभरातील आठ विभागाचे महाविद्यालयीन रंगकर्मी स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरून आपला सहभाग निश्चित करण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर, विभागीय अंतिम फेरी ७ ते १६ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होण्याआधी एकांकिकेच्या तयारीत गुंतलेल्या युवा रंगकर्मींना ‘लोकसत्ता रंगसंवाद’ या ऑनलाइन कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे. मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता रंगसंवाद’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून एकांकिकांचे सादरीकरण, आशय-विषय, लेखन, दिग्दर्शन, उत्तम संवादफेक करण्यासाठी आवाजावर कशा पद्धतीने मेहनत घेता येईल, अशा विविध बाबी समजून घेता येणार आहेत. निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून रंगभूमीवर नावाजलेले अजित भुरे आणि प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक देवेंद्र पेम हे ‘लोकसत्ता रंगसंवाद’च्या माध्यमातून रंगकर्मींशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा >>> महसूलवाढीसाठी मुंबईतील जागांचा लिलाव; महापालिका प्रशासन ठाम

‘लोकसत्ता लोकांकिका’ प्रवेश अर्ज, नियम व अटी आणि अधिक माहितीसाठी संपर्क मुंबई : मकरंद पाटील – ९८९२५४७२७५ ठाणे : कमलेश पाटकर (ठाणे ) – ९८२०६६४६७९, समीर म्हात्रे ( नवी मुंबई) – ९६१९६३०५६९, संजय भंडारे (वसई – विरार) – ७७२२०४८३८८, नीरज राऊत (पालघर) – ९९६०४९७३७८, अरविंद जाधव (डोंबिवली – कल्याण) – ९८२०७५२४५९ नाशिक : प्रसाद क्षत्रिय – ८०८७१३४०३३ रत्नागिरी : राजू चव्हाण – ९४२३३२२११६ पुणे : रामेश्वर बुट्टे – ७८७५९८०१८५, महेश निवांगुणे – ९९२२५३७५९९ छत्रपती संभाजीनगर : वंदन चंद्रात्रे – ९४२२२४५०६५, सदाशिव देशपांडे – ९९२२४००९७६ कोल्हापूर : संदीप गिरीगोसावी – ९६५७२५५२७७ नागपूर : गजानन बोबडे (नागपूर) – ९८२२७२८६०३, नितीन ईश्वरे (अमरावती- यवतमाळ) – ९७६३७०५८८७, भूषण दांडेकर (अकोला / बुलढाणा / वाशिम / पुसद) – ९०२८९३४४४६

आठ केंद्रांवर स्पर्धा

ही स्पर्धा राज्यातील आठ केंद्रांवर होणार आहे. ३० नोव्हेंबरला पुणे विभागीय प्राथमिक फेरीने स्पर्धेला सुरुवात होईल. २१ डिसेंबरला मुंबईत महाअंतिम फेरी होईल.

सहभाग कसा घ्याल?

http://tiny.cc/Lokankika2024 या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ज्या सत्रांमध्ये सहभागी व्हायचे असेल, त्याप्रमाणे नोंदणी करा. नोंदणी करून झाल्यावर ‘लोकसत्ता’कडून तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे वेबसंवादाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी https://www.loksatta.com या संकेतस्थळाला भेट द्या.