कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन
कृषी उद्योगाचे सध्याचे स्वरूप, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यावरील संभाव्य उपाय यावर ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दोनदिवसीय चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाने या चर्चासत्राचे उद्घाटन होईल.
वैचारिक आदान-प्रदान आणि भोवतालच्या समस्यांवर उपाययोजनेच्या दृष्टीने एकात्मिक विचार करण्याची परंपरा हा ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाचे वैशिष्टय़ आहे. एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर सहप्रायोजक असलेल्या या उपक्रमाच्या नव्या पर्वात शेती व शेतीशी संबंधित व्यवसाय आणि व्यवस्थेचा ऊहापोह गुरुवार २१ आणि शुक्रवार २२ फेब्रुवारीला होणार आहे. कृषी उद्योगाचे अर्थशास्त्र, कृषी संशोधनाची सद्य:स्थिती आणि अन्न प्रक्रिया उद्योग या विषयांवर पहिल्या दिवशी नामवंत तज्ज्ञ आपले विचार मांडतील.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार २२ फेब्रुवारी रोजी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि एमसीएक्सचे व्यवस्थापकीय संचालक मृगांक परांजपे वायदा बाजार आणि बाजारपेठच्या शेतीवरील परिणामांची चर्चा करतील.
दुसऱ्या सत्रात शेतीमधील नव्या प्रयोगांची, सेंद्रिय शेतीची गाथा विज्ञाननिष्ठ शेतीचा प्रयोग राबवणारे अरुण देशपांडे, सेंद्रीय शेती करणारे व्यंकट अय्यर आणि कृषीतज्ज्ञ सुधीर भोंगळे हे घेतील. तिसऱ्या सत्रात कृषी विमा, गोदामांची व्यवस्था यावर निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, कृषीतज्ज्ञ गिरधर पाटील मार्गदर्शन करतील. तर चर्चासत्राचा समारोप माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाषणाने होईल.
आजची सत्रे
पहिले सत्र
विषय : कृषी उद्योगाचे अर्थशास्त्र
सहभाग : राजू शेट्टी</p>
(खासदार, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना),
उदय तारदाळकर (कृषी विश्लेषक),
राजेंद्र जाधव (कृषी विश्लेषक)
दुसरे सत्र
विषय : कृषी संशोधनाची सद्यस्थिती
सहभाग : गणपती यादव
(कुलगुरू, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी),
प्रमोद रसाळ (पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य)
तिसरे सत्र
विषय : अन्न प्रकिया उद्योग
सहभाग : श्रीकांत सावे (व्यवस्थापकीय संचालक, हिल झिल रिसॉर्ट अॅण्ड वाईनरी, बोर्डी)
लक्ष्मी राव (प्रमुख, मधुमक्षिका पालन केंद्र), मनीषा धात्रक (व्यवस्थापकीय संचालिका, वरुण अॅग्रो, नाशिक)