उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात जे भाषण केले त्यावर मनसेने खोचक टोलेबाजी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि 151 रुपये मिळवा अशी ऑफरच मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली आहे. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य आहे हे महाराष्ट्र जाणतो. त्याचमुळे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी मनसे सोडताना दिसत नाही असेच कायम दिसून आले आहे. अशात सोमवारी उद्धव ठाकरेंनी जे भाषण केले त्यावरही मनसेने टीका केली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे म्हटले होते की 25 वर्षे युतीमध्ये राहून शिवसेना सडली. त्यानंतर युती होणार नाही असेही त्यांनी सांगितले. मात्र पंढरपूरमध्ये बोलताना युतीचा निर्णय जनताच घेणार असे म्हटले. त्यांच्या या वेगळ्या वक्तव्यातून नेमका काय अर्थ काढायचा हे आम्हाला तरी कळत नाही. त्यांच्या भाषणाचे विश्लेषण आणि अर्थ जो कोणी आम्हाला समजावून सांगेल त्याला आम्ही 151 रुपये बक्षीस देत आहोत अशी खोचक प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

व्हिडिओ

पंढरपूरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले. मात्र युतीचा निर्णय जनताच घेईल असे म्हणत त्यावरचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्याचमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या या भाषणावर टीका केली.

युती करायची की नाही याचा निर्णय जनताच घेईल, जागावाटपाशी आम्हाला घेणेदेणे नाही. त्याचं काय करायचं ते आपण नंतर पाहू असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी पंढरपूरमध्ये झालेल्या भाषणात केले. त्यांच्या या वक्तव्याचा आणि आधी केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ जोडत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि 151 रुपये मिळवा असा खोचक टोला लगावला आहे. युतीचा निर्णय जनता घेईल असे सांगत उद्धव ठाकरेंनी युतीची दारे पूर्ण बंद झालेली नाहीत हे दाखवून दिले आहे असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. शिवसेनेवर टीका केली असली तरीही भाजपाने शिवसेनेला गृहीत धरू नये असाही इशारा त्यांनी दिला आहे.

 

Story img Loader