मुंबई : ‘माझ्या विरोधात दंगल किंवा अन्य कोणताही गंभीर गुन्हा दाखल नाही. माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नाही. माझ्याकडे कोणतेही पिस्तुल नाही. वडिलोपार्जित दोन बंदुका आमच्याकडे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व २५० शस्त्रधारकांना शस्त्रात्रे जमा करण्याचा आदेश दिला आहे. माझ्यासह केवळ १३ जणांना शस्त्रात्रे जमा करण्याचा आदेश दिला, ही माहिती चुकीची असल्याचा खुलासा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
‘मंत्री दीपक केसरकर यांना पिस्तुल जमा करण्याचे आदेश’ या मथळय़ाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर केसरकर यांनी हा खुलासा केला आहे. माझ्या वडिलांकडे दोन बंदुकांचा परवाना होता. त्यातील एक बंदुक वारशाने माझ्याकडे तर दुसरी बंदुक भावाला मिळाली. वडिलांची आठवण म्हणून या बंदुका आम्ही पूजनासाठी वापरतो. गेल्या ५० वर्षांत या शस्त्रांचा कोणताही वापर झालेला नाही, असे केसरकर यांनी खुलाशात म्हटले आहे.निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील सर्वानाच शस्त्रे जमा कण्याचा आदेश दिला जातो. त्याप्रमाणे आमच्याकडे असलेली शस्त्रे वेळोवेळी जमा करतो, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.