मुंबई : कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा, डिजिटल माध्यमे आदी विविध क्षेत्रांतील संधींची आणि नवीन शैक्षणिक धोरणाची ओळख करून देणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा नुकतीच मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यार्थी व पालकांच्या उत्तम प्रतिसादात झाली. या कार्यशाळेचे दुसरे पर्व ठाण्यात होत आहे. ठाण्यातील हॉटेल टिप टॉप प्लाझा येथे २ आणि ३ जून रोजी ही कार्यशाळा होणार आहे.
‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह इतर उच्च शिक्षणाच्या संधी, शैक्षणिक प्रवासातील विशिष्ट टप्प्यांनंतर पुढे काय करायचे, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रवेश प्रक्रियेवेळी अभ्यासक्रम निवडताना येणाऱ्या ताणतणावाला कसे सामोरे जावे आणि आयुष्यात मानसिक आरोग्य कसे जपावे याबद्दल मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधता येईल. त्याशिवाय संशोधन क्षेत्र आणि त्यामधील संधी, डिजिटल माध्यमे, कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटीमुळे होणारे परिणाम, नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणारे बदल विद्यार्थ्यांना समजून घेता येतील.
बदलत्या काळानुसार करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
मुंबईत भरभरून प्रतिसाद
विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा भविष्यवेध आणि नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा मागोवा घेणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन शाळा २६ व २७ मे रोजी प्रभादेवी येथील रिवद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पालकांसह या कार्यशाळेत हजेरी लावली होती. अभ्यासक्रम व शिक्षण संस्थांसंबंधित माहिती कक्षामध्ये (स्टॉल्स) विद्यार्थ्यांनी आवर्जून जाऊन नव्या अभ्यासक्रमांची व शिक्षण क्षेत्रातील विविध गोष्टींची ओळख करून घेतली.
शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यशाचा मार्ग अधिक सुकर होतो. देशउभारणीत सहभागी व्हायचे असल्यास, सरकारी नोकरीशिवाय पर्याय नाही, ही बाब निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी अधोरेखित केली. ज्येष्ठ संशोधक डॉ. अरविंद नातू यांनी संशोधन क्षेत्रातील अभ्यासक्रम तसेच करिअरच्या संधींचा मागोवा घेत संशोधनात प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाचे बारकावे आणि शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे विश्लेषण डॉ. नितीन करमळकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड यांनी विद्यार्थ्यांना दिली. केतन जोशी यांनी सर्वच क्षेत्रातील समाजमाध्यमे व डिजिटल माध्यमांचे महत्त्व आणि कृत्रिम बुद्धिमतेचे जग, चॅट जीपीटी यामुळे करिअरवर होणारे परिणाम याबाबत विश्लेषण केले. पारंपारिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या, याबाबत विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले.