साकीनाका येथील खैरानी रोडवरील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या एकमजली छोटेखानी कारखान्यात शुक्रवारी पहाटे स्फोट होऊन भिंत कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कुणाला अटक केलेली नाही. नेमका स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुरुवातीला हा स्फोट म्हणजे घातपात आहे का, याची शंका निर्माण झाल्याने राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासह बॉम्ब शोधक पथकही दाखल झाले होते. मात्र रसायनांमुळे हा स्फोट झाल्याचे स्पष्ट होताच या पथकाने सुटकेचा निश्वास सोडला.
शेजारी राहणारे संपूर्ण पटेल कुटुंबीय ढिगाऱ्याखाली अडकले गेले. याबाबतची माहिती मिळताच साकीनाका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर दळवी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. स्फोटामुळे संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त झाला होता. या घटनेत सुखा पटेल (६५), त्यांची मुलगी भारती राठोड (३५), मुलगा गणेश (४०), नाती मनीषा (१३) आणि नेहा (१३) यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी जखमींना बाहेर काढून राजावाडी इस्पितळात नेले. जखमींपैकी मंगेश पटेल (४२) हा कसाबसा बाहेर पडल्याने बचावला. कारखान्यात काम करणारे अमित हरिजन (३६) आणि भय्यालाल (३०) हे दोघे ८५ टक्के भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी इस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा