मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. वाझे यांना अटक करण्यात आले तेव्हा, ते अधिकृत कर्तव्य बजावत नव्हते. त्यामुळे, त्यांच्यावरील अटकेच्या कारवाईसाठी गृहविभागाच्या पूर्व मंजुरीची आवश्यकता नव्हती, अशी टिप्पणीही न्यायालयाने वाझे यांची याचिका फेटाळताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन उभे करताना, त्याचा कट रचताना आणि हिरेन यांच्या खुनाचा कट अंमलात आणताना वाझे हे अधिकृत कर्तव्य बजावत नव्हते. त्यामुळे, त्यावेळी आपण कर्तव्य बजावत होतो हा वाझे यांचा दावा समजण्यापलिकडे असल्याचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळताना नमूद केले. तसेच, उपरोक्त घटनांच्यावेळी वाझे हे अधिकृत कर्तव्य बजावत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अटक कारवाई करण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राज्य सरकारची मंजुरी घेणे आवश्यक नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही गाडी रस्त्यावर उभी केल्याची जबाबदारी स्वीकारण्याची सक्ती वाझे यांनी हिरेन यांच्यावर केली होती. परंतु, त्याने नकार दिल्यानंतर वाझे यांनी सहआरोपींसह हिरेन यांच्या हत्येचा कट रचला, असे सकृतदर्शनी निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम ४५(१) नुसार, आरोपी अधिकृत कर्तव्य बजावत असेल, तरच त्याच्यावर अटकेची कारवाई करताना सरकारच्या पूर्वमंजुरीची आवश्यकता असते. तथापि, याप्रकऱणातील तथ्यांच्या विचार करता, दोन्ही घटना घडल्या त्यावेळी, वाझे हे अधिकृत कर्तव्य बजावत होते असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केले.

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही गाडी सापडली होती. ही एसयूव्ही हिरेन याच्या मालकीची होती, असे उघड झाले. त्याचदम्यान, हिरेन याचा मृतदेह ठाण्यातील एका नाल्याजवळ सापडला होता. या दोन्ही घटनांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांतर्गतत वाझे यांना मार्च २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. अटक करण्यापूर्वी योग्य ती मंजुरी घेण्यात आली नसल्याने आपल्याला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे, आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी वाझे यांनी याचिकेद्वारे केली होती.