मुंबई : मुंबईतून कोकणात, सिंधुदुर्गात अवघ्या काही तासांत पोहोचता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेलेल्या मुंबई – सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या आराखडय़ास राज्य सरकारने मंजुरी दिली. मंजुरी मिळाल्याने आता या प्रकल्पासाठी भूसंपादनास सुरुवात करण्यात येणार आहे. अंतिम मंजूर आराखडय़ानुसार पेणमधील बलवली ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवीदरम्यान हा महामार्ग उभारण्यात येणार आहे. हा महामार्ग एकूण ३८८.४५ किमी लांबीचा असणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई – गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून नागरिकांना मुंबईतून कोकणात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आराखडय़ाचे काम पूर्ण करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या आराखडय़ास नुकतीच मंजुरी देण्यात आली असून यासंबंधीचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.

आराखडय़ास मंजुरी मिळाल्याने आता लवकरच एमएसआरडीसी या महामार्गासाठी भूसंपादनास सुरुवात करेल, अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिली. भूसंपादन आणि निधी उपलब्ध झाल्यास भविष्यात महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा मागवून कामास सुरुवात करण्यात येईल. ही प्रक्रिया बरीच मोठी असल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यास आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र हा महामार्ग तयार झाल्यास मुंबई – कोकण प्रवास सुकर आणि वेगवान होणार आहे.  

चार टप्प्यांत काम..  

एकूण ३८८.४५ किमी लांबीच्या या महामार्गाचे चार टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला टप्पा पेण, बलवली गाव ते रायगड (रत्नागिरी जिल्ह्याची सीमा) असा ९५.४० किमीचा असणार आहे. तर ६९.३९ किमीचा रायगड (रत्नागिरी सीमा) ते गुहागर, चिपळूण असा दुसरा टप्पा असेल. तिसऱ्या टप्प्यात गुहागर ते रत्नागिरी (सिंधुदुर्ग सीमा) असा १२२.८१ किमी लांबीचा महामार्ग बांधण्यात येणार आहे. तर शेवटचा टप्पा हा १००.८४ किमीचा असणार असून तो रत्नागिरी (सिंधुदुर्ग सीमा ) ते पत्रादेवी (महाराष्ट्र आणि गोवा सीमा) असा असणार आहे.   

वैशिष्टय़े

  • प्रवेश नियंत्रित असा हा सहा पदरी मार्ग असेल.
  • या महामार्गाची रचना ताशी १०० किमी वेग अशी असणार आहे.
  • कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग पेणपासून सुरू होणार असला तरी मुंबई पारबंदर प्रकल्पावरून (शिवडी – न्हावाशेवा सागरी मार्ग) या महामार्गावर पोहचता येणार आहे.
  • या प्रकल्पामुळे मुंबई – सिंधुदुर्ग प्रवास काही तासांत करता येणार. 
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expressway between balavali in pen to patradevi in sindhudurg ysh
Show comments