मुंबई : अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता यावे आणि ऐनवेळी त्यांची धावपळ होऊ नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) यंदा डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. मात्र एमबीए/एमएमएस आणि एमसीए, बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंट्रीग्रेटेड, बी-डिझाईन आणि एम-एचएमसीटी या पाच अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २५ डिसेंबरपासून एमबीए/एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली होती. त्याचप्रमाणे बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंट्रीग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नोंदणीला ३१ डिसेंबर आणि बी-डिझाईन आणि एम-एचएमसीटी या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला ४ जानेवारी रोजी सुरुवात केली होती. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी एक महिन्यांची मुदत दिली होती. मात्र त्या कालावधीत अल्प प्रतिसाद मिळाला होता. एमबीए/एमएमएससाठी ४४ हजार ६३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंट्रीग्रेटेड अभ्यासक्रमासाठी ६९०, बी-डिझाईन अभ्यासक्रमासाठी ३२३, एम-एचएमसीटी अभ्यासक्रमासाठी ३६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली होती. विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमांचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्या मुदतीतही अनेक विद्यार्थांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणी करावी व ज्यांना अर्ज नोंदणी शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी हूकू नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमबीए/एमएमएस आणि एमसीए, बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंट्रीग्रेटेड, बी-डिझाईन आणि एम-एचएमसीटी या पाच अभ्यासक्रमांना अर्ज नोंदणी करण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.