मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे. या निर्णयानुसार ७ आणि १७ सप्टेंबर रोजी ‘मेट्रो १’च्या सेवेचा कालावधी ५० ते ५५ मिनिटांनी वाढविण्यात आला आहे. अतिरिक्त कालावधीत ‘मेट्रो १’वर मेट्रोच्या सहा अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.
हेही वाचा – मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक
हेही वाचा – मुंबई – कुडाळदरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या
गणेशोत्सवादरम्यान वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी एमएमओपीएल ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील सेवेचा कालावधी वाढविला आहे. त्यानुसार गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थात ७ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत ‘मेट्रो १’ची सेवा सुरू राहणार आहे. वर्सोवा – घाटकोपर मार्गिकेवर दररोज रात्री ११.२० वाजता बंद होणारी मेट्रो सेवा गणेश चतुर्थीला आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी रात्री १२.१० वाजता बंद होणार आहे. तर घाटकोपर – वर्सोवा मार्गिकेवरील सेवा रात्री ११.४० ऐवजी ७ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी रात्री १२.४५ वाजता बंद होणार आहे. एकूणच ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील सेवेचा कालावधी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी रात्री ५० ते ५५ मिनिटांनी वाढविण्यात आला आहे.