मुंबई : भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिकाविषयक विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे परिषदेने जाहीर केले आहे. त्यानुसार बीएस्सी नर्सिंग, एम.एस्सी. नर्सिंग, सहाय्यक परिचारिका प्रसाविका (एएनएम), सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम), पदवीपूर्व सामान्य नर्सिंग (पीबीबीएस्सी नर्सिंग), पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि क्रिटिकल केअरमधील परिचारिका अभ्यासक्रम (एनपीसीसी) आदींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी परिचारिकाविषयक विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. सप्टेंबरमध्ये प्रवेश परीक्षा अखेरच्या टप्प्यात असताना भारतीय परिचर्या परिषदेने या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ३१ ऑक्टोबरपर्यंत या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपत आली असताना भारतीय परिचर्या परिषदेने पुन्हा एकदा परिचारिकाविषयक बीएस्सी नर्सिंग, एम.एस्सी. नर्सिंग, सहाय्यक परिचारका प्रसाविका (एएनएम), सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम), पदवीपूर्व सामान्य नर्सिंग (पीबीबीएस्सी नर्सिंग), पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि क्रिटिकल केअरमधील परिचारिका अभ्यासक्रम (एनपीसीसी) आदींमध्ये प्रवेश घेण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे. मात्र ही मुदतवाढ देताना परिषदेने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून, त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना परिचारिका महाविद्यालये व संस्थांना दिल्या आहेत.

हेही वाचा >>>दागिन्यांच्या चोरी प्रकरणी मोलकरीण पोलिसांच्या ताब्यात

३१ ऑक्टोबरपर्यंत झालेले प्रवेश नियमित वर्गातील प्रवेश समजण्यात यावेत. तर १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणारे प्रवेश हे अनियमित वर्ग समजण्यात येणार आहेत. मात्र मुदतवाढीनंतर प्रवेशाच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या एकूण जागांपेक्षा अधिक असता कामा नये, अशा सूचना भारतीय परिचर्या परिषदेने दिल्या आहेत. तसेच यानंतर पुन्हा प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद महाविद्यालयांनी घ्यावी, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

परिषदेची मार्गदर्शक तत्त्वे

बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनियमित वर्गासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात यावी. तसेच परीक्षेला बसण्यासाठी विद्याथ्याची ८० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. जीएनएम परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान ८० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एएनएमच्या विद्यार्थ्यांनी पदविका प्रमाणपत्र मिळविण्यापूर्वी अभ्यासक्रमातील सर्व कौशल्ये अवगत करणे आवश्यक आहे.