मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जिजामातानगर येथे मुलामुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे. मात्र या प्रकल्प पूर्ण होण्यास काही कारणांनी विलंब झाल्याने आता प्रकल्प पूर्णत्वासाठी कंत्राटदारास मे २०२६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हे वसतिगृह पूर्ण होऊन ते कार्यान्वित होण्यासाठी मे २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान १८ मजली वसतीगृहाच्या इमारतीचे आतापर्यंत १७ मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले असून या बांधकामाची टक्केवारी ५५ ते ६० टक्क्यांच्या दरम्यान आहे.
मुंबईत नोकरीधंद्याच्या निमित्ताने तसेच शिक्षणासाठी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यांतून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी येतात. अशावेळी मुंबईसारख्या महागड्या शहरात या मुलामुलींना स्वस्तात जागा उपलब्ध होत नाही. त्यांना अनेक अडचणी येतात. ही बाब लक्षात घेत म्हाडाने काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे मुलामुलींसाठी एक वसतिगृह तर ताडदेव येथे नोकरदार महिलांसाठी एक वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिजामाता नगर येथील १८२१ चौ. मीटर जागेवर १८ मजली वसतिगृह बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम करून २०२२ मध्ये ‘सी बी अँड सन्स’कंपनीला कंत्राट देण्यात आले. वास्तुशास्त्रज्ञ म्हणून ‘एस पी शेवडे अँड असोसिएट’ या कंपनीची नियुक्ती केली आणि त्यानंतर काही महिन्यांतच १६ कोटी रुपये खर्चाच्या वसतीगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आली. बांधकाम सुरु झाल्यापासून दोन वर्षात बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे कंत्राटदारास आता मे २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली.
जिजामाता नगर येथील १८ मजली वसतिगृहाच्या इमारतीतील १७ मजल्यापर्यंतचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. एकूण बांधकाम ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. १७ मजल्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले असले तरी अंतर्गत कामाची व्याप्ती बरीच मोठी असते. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता कंत्राटदारास मे २०२६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले. प्रकल्पस्थळ ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी काम करण्यात अनेक अडचणी येत आहेत. बाजूला झोपडपट्टी असून येथून यंत्रसामग्री वा बांधकाम साहित्य नेण्यासाठी अडचणी येत असल्याने कामास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी आता कामाला वेग देत मे २०२६ मध्ये वसतिगृह पूर्ण करण्याचे नियोजन मंडळाचे असल्याचेही सांगण्यात आले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
जिजामाता नगर येथील १८२१ चौ मीटर जागेवर वसतिगृह
१८ मजली इमारत
३७५ खोल्या, ५०० जणांच्या राहण्याची सोय
१६ कोटी रुपये बांधकाम खर्च
खाणावळ, बँक, व्यायामशाळा, वाहनतळ अशा सर्व सोयीसुविधा
सी बी अँड सन्स कंपनीकडून बांधकाम
तर मेसर्स एस पी शेवडे अँड असोसिएट वास्तुशास्त्रज्ञ म्हणून पाहतेय काम
मे २०२६ मध्ये काम पूर्ण होणार