लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरु होणार आहे. सदर पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी २९ मे ते ९ जून या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरले आहेत. तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठीच्या राज्य मंडळाने मुदतवाढ दिली असून, आता १८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

बारावीची पुरवणी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर १८ जूनपर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. या पुरवणी परीक्षेसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्यमंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आणखी वाचा-एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, पीसीएम आणि पीसीबी गटातून एकूण २८ विद्यार्थ्यांना शंभर परसेंटईल

‘सदर परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेतील माहिती ऑनलाइन अर्जामध्ये समाविष्ट करता येणार आहे. श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ आणि मार्च २०२४ अशा लागोपाठ दोनच संधी उपलब्ध असतील’, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.