म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरांच्या अर्जांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र या मुदतीत गिरणी कामगार वा त्यांचे वारस पुढे न आल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. परिणामी मुंबई मंडळाने अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना अखेर मुदतवाढ दिली असून, आता त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.
गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई मंडळाकडे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. मात्र या अर्जांमध्ये अनेक चुका आणि त्रुटी असल्याचे आतापर्यंत काढण्यात आलेल्या सोडतीच्या पात्रता निश्चितीदरम्यान लक्षात आले. या चुकांमुळे अनेक जण अपात्र ठरत असल्याचेही निदर्शास आले. या पार्श्वभूमीवर मंडळाने एकाच वेळी एकापेक्षा अधिक अर्ज करणारे, गिरणीचा संकेत क्रमांक चुकीचा असलेले, नावात आणि इतर माहितीत चूक असलेले अर्जदार शोधून काढले आहेत. त्यानुसार अशा १२ हजारांहून अधिक अर्जदारांची यादी मंडळाने म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, संबंधित अर्जदारांकडून या अर्जांमध्ये दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना राष्ट्रपती पोलीस पदक
अर्जातील दुरुस्तीसाठी अर्जदारांना १९ डिसेंबर ते १७ जानेवारी अशी मुदत देण्यात आली होती. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाप्रमाणे या मुदतीत म्हाडा मुख्यालयात येऊन दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक होते. दरम्यान, दुरुस्ती न केल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. असे असतानाही विहित मुदतीत यादीतील कामगार आणि वारस पुढे आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार या प्रक्रियेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. १७ जानेवारीला पहिली मुदत संपली असून, आता अर्जात दुरुस्ती करण्यासाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित अर्जदारांनी पुढे यावे आणि अर्जात दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मुदतीत दुरुस्ती न केल्यास संबंधितांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही मंडळाने निवेदनात म्हटले आहे.