मुंबई: बंद गिरण्यांच्या जागेवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाकडे दाखल झालेल्या १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती सध्या सुरू आहे. या प्रक्रियेसाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून हा कालावधी संपुष्टात आला आहे. असे असले तरी पात्रता निश्चितीसाठी अद्याप अनेकांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी आणि पात्रता निश्चितीसाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जानेवारी २०२४ पर्यंत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना कागदपत्रे जमा करता येणार आहेत.
म्हाडाकडे दोन टप्प्यात गिरणी कामगारांचे पावणे दोन लाख अर्ज दाखल झाले आहेत. यातील एक लाख ५० हजार ४८४ कामगारांना हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने म्हाडा सोडतीच्या धर्तीवर या कामगारांची सोडतीपूर्वीच पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाचे मुंबई मंडळ कागदपत्रे जमा करून घेत आहे. कामगार विभाग पात्रता निश्चिती करीत आहे. पात्रता निश्चितीच्या विशेष अभियानाद्वारे १४ सप्टेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत ९५ हजार ८१२ कामगार आणि त्यांचा वारसांनी संगणकीय पद्धतीने आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा केली आहेत. तर यापैकी ७२ हजार ०४१ कामगार / वारस आतापर्यंत पात्र ठरले आहेत.
हेही वाचा… महादेव बेटिंग ॲपप्रकरणात अभिनेता साहिल खानसह चौघांना समन्स
पात्रता निश्चितीचे विशेष अभियान जाहीर करतानाच ते कालबद्ध असेल असे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १४ सप्टेंबरला सुरू झालेले हे अभियान १४ डिसेंबरला संपुष्टात येणार होते. मात्र आता या प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १४ जानेवारी २०२४ पर्यंत कागदपत्र जमा करून पात्रता निश्चिती करून घेता येणार आहे. काही अडचणी आल्यास कामगारांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९७१११९४१९१ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या १३ पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र, तिकीट क्रमांकाची प्रत, सेवा प्रमाणपत्र, लाल पास, भविष्य निर्वाह निधी क्रमांक, इएसआयसी क्रमांक, गिरणी प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे.