मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर फूड प्लाझासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागविलेल्या निविदेला २ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक कंपन्यांच्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई – नागपूरदरम्यानच्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर – शिर्डी हा पहिला टप्पा सेवेत दाखल झाला आहे. तर शिर्डी – ठाणे महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र या महामार्गात प्रवाशांसाठी खानपानासह इतर सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमीच्या मार्गावर १६ ठिकाणी फूड प्लाझा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या निविदेला प्रतिसाद न मिळल्याने तिसऱ्यांदा फेरनिविदा काढावी लागली होती. आता तिसऱ्या फेरनिविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा – “औरंगाबादचं नामांतर करण्याची हिंमत भाजपात नाही”; संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “ढोंगी लोक…”

निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी होती. पण इच्छुक कंपन्यांचे काही प्रश्न असल्याने निविदेला २ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तिसऱ्यांदा फेरनिविदा काढण्यात आल्यामुळे एक निविदा सादर झाली तरी ती अंतिम करून कंत्राट देता येणार आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच फूड प्लाझा आणि इतर सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे निविदा लवकरात लवकर अंतिम करून फूड प्लाझा, पेट्रोल पंप आणि इतर सुविधा विकसित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सवात मध्यरात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी, वर्षभरातील ११ दिवसांची यादी जाहीर

१६ ठिकाणच्या सुविधेसाठी एकच कंत्राटदार

निविदेनुसार १६ ठिकाणी फूड प्लाझा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकच कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. एकाच कंत्राटदाराच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर, अंदाजे ८०० कोटींपर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेस वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader