नमिता धुरी

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आढळणाऱ्या बहुरूपी मराठीचे सर्वेक्षण गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. ‘राज्य मराठी विकास संस्था’ आणि डेक्कन महाविद्यालयाच्या भाषाविज्ञान विभागाने हाती घेतलेल्या या प्रकल्पात शाब्दिक भेद, व्याकरणिक भेद आणि कथन अशा तीन पातळ्यांवर महाराष्ट्रीय बोलींचा अभ्यास केला जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रीय बोलींचे नकाशे तयार केले जाणार आहेत.

यापूर्वी झालेली महाराष्ट्रीय बोलींची सर्वेक्षणे मर्यादित स्वरूपातील आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा आवाका मोठा आहे. राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील किमान दोन गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. ज्या गावांच्या जवळ दुसरे राज्य किंवा दुसरा जिल्हा आहे, अशा सीमारेषेवरील गावांचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. स्त्री, पुरुष, जात, वय, सुशिक्षित, अशिक्षित अशा सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साधारण ८ ते १५ व्यक्तींच्या मुलाखती प्रत्येक गावात घेतल्या जातात. काही कृती दाखवणाऱ्या ७० चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. मुलाखत देणाऱ्या व्यक्ती चित्रफितीतील प्रसंगाचे वर्णन आपल्या भाषेत करतात. तसेच एखादी पारंपरिक कथा किंवा अनुभवही कथन करतात. या आधारावर प्रत्येक वस्तूसाठी प्रत्येक बोलीत कोणते शब्द वापरले जातात याची नोंद केली जाते. क्रियापद, सर्वनाम, प्रत्यय, इत्यादी व्याकरणिक घटकांमधील फरकही लक्षात येतात.आतापर्यंत २५ जिल्ह्य़ांतील १०१ तालुक्यांतील २३१ गावांमध्ये पावणेतीन हजार मुलाखती झाल्या आहेत. २०१७ साली सुरू झालेला हा प्रकल्प येत्या २-३ वर्षांत पूर्ण होईल.

‘प्रमाण मराठी हीसुद्धा एक बोलीभाषाच आहे. त्यामुळे प्रमाण मराठीतील शब्दांना बोलीभाषेत शब्द न शोधता, सर्वच बोलींमधील भेदांचा अभ्यास केला जात आहे. यामुळे महाराष्ट्रीय बोलींचे दस्तावेजीकरण होऊ शके ल. यातून बोलीभाषा कशा बदलत गेल्या हेसुद्धा कळेल. याचा फायदा राज्याचे भाषिक धोरण ठरवताना होईल, असे प्रकल्पप्रमुख आणि डेक्कन महाविद्यालयाच्या भाषाशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. सोनल कु लकर्णी-जोशी यांनी सांगितले. या सर्वेक्षणाचा फायदा बोलीभाषांतून शिक्षण उपलब्ध करण्यासाठी होण्याच्या शक्यतेलाही त्यांनी दुजोरा दिला.

नकाशा कसा असेल?

एखाद्या संकल्पनेवर क्लिक के ल्यास त्यासाठी विविध बोलींमध्ये वापरले जाणारे शब्द समोर दिसतील. उदा. – ‘पाणी पिण्याचे भांडे’ या संकल्पनेसाठी फु लपात्र, गडू, भांडं, इत्यादी शब्द दिसतील. अशाच प्रकारे क्रियापद, सर्वनाम, प्रत्यय, इत्यादी व्याकरणिक घटकांतील भेदही दाखवले जातील. अक्षांश, रेखांश यांच्या साहाय्याने प्रत्येक गावाचे स्थान दाखवलेले असतील. एखाद्या गावावर क्लिक के ल्यास तेथील बोलींची माहिती मिळेल. एक संके तस्थळ विकसित करून तेथे हे नकाशे प्रदर्शित केले जातील. मराठीबाबत पूर्वी झालेल्या सर्वेक्षणांचे संदर्भही येथे उपलब्ध असतील. संके तस्थळावरील ‘गाव गजाली’ सदरात प्रत्येक गावातील पारंपरिक क थांचे ध्वनिमुद्रणही उपलब्ध असेल.

यापूर्वीचे अभ्यास

*    सव्‍‌र्हे ऑफ मराठी डायलेक्ट (प्रामुख्याने कोकणीचे उपप्रकार) – डॉ. अमृतराव घाटगे

*  डॉ. रमेश धोंगडे – शब्दस्तरावरील अभ्यास

*  जॉर्ज ग्रियर्सन यांच्या भारतीय भाषिक सर्वेक्षणांतर्गत झालेले मराठीचे सर्वेक्षण

Story img Loader