महापालिकेचे सहाय्यक अभियंता प्रमोद वाघमारे याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका दुकानदाराकडून दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड पश्चिम येथील आरआरटी रोडवर रिद्धी कर्टन्स हे दुकान आहे. या दुकान मालकाने बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करून कथित सामाजिक कार्यकर्ता पंकज चंदनशिवे याने मालकाकडून दीड लाखांची खंडणी मागितली होती. त्याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी चंदनशिवेला अटक केली. त्या प्रकणाचा तपास केल्यानंतर अभियंता प्रमोद वाघमारे याचाही या खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचे आढळल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. वाघमारे फरार असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
दरम्यान, महापालिकेचे प्रभाग क्रमांक १५९ चे नगरसेवक अश्रफ आझमी यांच्यासह इतरांवर वाकोला पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी फरिद अन्सारी यांच्या मालमत्तेचा वाद सुरू होता. त्यांनी रस्त्यात अतिक्रमण केले असून ते पालिकेच्या माध्यमातून पाडले जाईल, अशी धमकी नगरसेवक आझमी यांनी दिल्याचा अन्सारी यांचा आरोप होता. ही कारवाई थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितल्याचाही त्यांनी आरोप केला. अन्सारी यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर आझमी यांच्यावर वाकोला पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आझमी हे समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा