मुंबईः साडेतीन किलो सोन्याची चोरी झाल्याचा बनाव करून ते सोने परत देण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. याप्रकरणी केरळ येथील सोन्याची घाऊक व्यापारी असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी तक्रारदार महिलेचे पावणे दोन कोटींचे सोने घेतले व ते परत करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितली, असा आरोप आहे.
मन्सूर अहमद पठाण (३८) आणि समद सलीम खान (२९) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात फसवणूक, खंडणी व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळमधील तक्रारदार महिला विविध सराफांकडून सोन्याचे दागिने घाऊक खरेदी करून मुंबईत विविध दलालांमार्फत विकण्याचे काम करते.आरोपी समद खान मुंबईतील दलाल होता. तो तक्रारदार महिलेसाठी सोने विकायचा आणि नंतर तिला पैसे द्यायचा. तक्रारदार सोन्याचे दागिने मुंबईतील कर्मचारी अब्दुल वासीद याच्यामार्फत पाठवायची. अब्दुल ते दागिने पुढे मुंबईत खानला द्यायचा.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तक्रारदाराने वासिद यांच्यामार्फत एक कोटी ८७ लाख रुपये किमतीचे साडेतीन किलो सोन्याचे दागिने खान यांना पाठवले होते. ५ डिसेंबरला खानने वासिद राहत असलेल्या साकीनाका येथील हॉटेलमध्ये जाऊन दागिने घेतले. त्यानंतर ते घरी जात असताना अनोळखी चोरट्यांनी सोन्याची बॅग हिसकावून नेल्याचे खान यांनी तक्रारदार महिलेला सांगितले. तक्रारदार मुंबईला आली. त्यानंतर डोंगरी येथील शालीमार हॉटेलजवळ खान यांच्या घरी गेली. तक्रारदाराने घटनेबाबत विचारले असता खानने त्याचा चुलत भाऊ मन्सूर पठाणसह हा बनाव रचल्याचे मान्य केले. तसेच दागिने परत मिळवण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. घाबरून तक्रारदार महिलेने पैसे देण्यास होकार दिला.
मन्सूरने ७ डिसेंबरला अल्ताफ बेअरिंग नावाच्या एका व्यक्तीला तक्रारदाराकडून ५ लाखांची रोख घेण्यासाठी पाठवले आणि सोने पाठवण्याचे आश्वासन दिले. तक्रार नोंदवल्यानंतर अल्ताफ सोने घेऊन येईल, या आशेने तक्रारदार हॉटेल शालीमार येथे थांबली होती. पण तो आलाच नाही आणि त्याचा मोबाईलही बंद आढळून आला. त्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. पुढे हा गुन्हा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी समद खान आणि मन्सूर पठाण यांना अटक केली.