लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील ६० वर्षीय व्यक्तीच्या अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सुमारे ३७ लाख रुपये रोख व मौल्यवान वस्तू घेणाऱ्या तीन महिलांविरोधात कांदिवली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये तक्रारदाराचे प्रेमसंबंध असलेली महिला, तिची मुलगी व मुलीची मैत्रीण अशा तिघांचा समावेश आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणीला अटक केली असून आई-मुलीचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ६० वर्षीय व्यक्ती एका बांधकाम कंपनीत काम करते. ते एका महिलेशी काही महिन्यांपासून संपर्कात होते. दोघांचेही प्रेमसंबंध होते. महिला, तिची मुलगी आणि तिच्या २१ वर्षीय मैत्रिणीने त्यांना धमकावण्यास सुरूवात केली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार २३ ऑगस्ट रोजी आरोपी तरुणीने त्यांना त्यांच्या घराजवळ सोडताना चाकूचा धाक दाखवून १४ हजार ५०० रुपये रोख लुटले. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान, त्या तिघांनी त्याच्या अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला सांगण्याची धमकी देत ३० लाख ८८ हजार रुपये रोख, तसचे युपीआयद्वारे तीन लाख ९८ हजार रुपये तसेच पावणे दोन लाख रुपयांचा महागडा आयफोन प्रो मॅक्स अशा वस्तू जबरदस्तीने घेतल्या.
आणखी वाचा-१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक असल्यास वाहन जप्त होणार!
घाबरलेल्या तक्रारदाराने त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. मात्र, १० डिसेंबर रोजी आरोपींनी त्यांच्याकडे सुमारे दीड कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी संबंधित महिला, तिच्या मुली आणि मुलीच्या मैत्रिणीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) (दरोडा), ३०८ (२) (खंडणी), ३०८ (३) (कोणालाही जखमी करण्याची धमकी किंवा खंडणीसाठी भीती निर्माण करणे), आणि ३ (५) (सामूहिक हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.