स्वस्त विजेसाठी ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला सोडचिठ्ठी देऊन ‘टाटा पॉवर’कडे गेलेल्या वीजग्राहकांसाठी राज्य वीज नियामक आयोगाने सुधारित ‘क्रॉस सबसिडी आकार’ लागू केला आहे. त्यामुळे ‘टाटा’कडे गेलेल्या घरगुती वीजग्राहकांवर प्रति युनिट २.५३ रुपये ते ३.९४ रुपयांपर्यंतचा वाढीव बोजा पडणार आहे.
रिलायन्सकडून वीजग्राहक मोठय़ा प्रमाणावर ‘टाटा’कडे गेल्याने दरमहा ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मिळणारे अनुदान बंद
झाले असून गेल्या दोन वर्षांत तब्बल एक हजार कोटी रुपयांचा
बोजा ‘रिलायन्स’च्या छोटय़ा वीजग्राहकांवर थकला आहे. त्यामुळे तातडीने क्रॉस सबसिडी आकारात वाढ करावी, अशी मागणी ‘रिलायन्स’ने केली होती. त्यावर वीज आयोगाने आता सुधारित अधिभार जाहीर केला आहे.
आतापर्यंत दरमहा ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती वीजग्राहकांना क्रॉस सबसिडी आकार नव्हता. आता दरमहा ३०० युनिट ते ५०० युनिट वीज वापरणाऱ्यांना प्रति युनिट दोन रुपये ५३ पैसे जादा मोजावे लागतील. तर दरमहा ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना आतापर्यंत केवळ तीन पैसे प्रति युनिट इतका अधिभार द्यावा लागत होता. आता तो प्रति युनिट तीन रुपये ९७ पैसे इतका करण्यात आला आहे. म्हणजेच प्रति युनिट थेट तीन रुपये ९४ पैशांचा भरुदड त्यांना बसणार आहे. या वाढीव अधिभारामुळे ‘टाटा’ आणि ‘रिलायन्स’च्या वीजदरातील प्रचंड तफावत आता कमी होणार आहे.