मोबदल्यात घरे बांधून घेणार!
गेले काही वर्षे रखडलेला म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागावा, या हेतूने जादा चटईक्षेत्रफळ वाढवून देण्याचे प्रस्तावित आहे. या जादा चटईक्षेत्रफळाचा लाभ उपलब्ध करून देताना त्याचा फायदा विकासकाला न होता म्हाडाला सामान्यांसाठी घरे बांधून घेण्याचेही ठरविण्यात आल्याचे कळते. मात्र पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी आणखी चटईक्षेत्रफळ वाढवून देण्यास आक्षेप घेतल्यामुळे तूर्तास ही फाईल नगरविकास खात्याकडे प्रलंबित असल्याचे सूत्रांनी
सांगितले.
म्हाडा वसाहतींना पूर्वी १.२ चटईक्षेत्रफळ आणि १.२ टीडीआर दिला जात होता. त्यानंतर सरसकट २.५ चटईक्षेत्रफळ जाहीर करण्यात आले. नव्या गृहनिर्माण धोरणानंतर म्हाडासाठी असलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) मध्ये जादा क्षेत्रफळ देताना प्रिमिअम आकारणे किंवा घरे बांधून घेणे असे पर्याय देण्यात आले. त्याचवेळी प्रत्येक वसाहतीतील वैयक्तिक रहिवाशाला लागू असलेले चटईक्षेत्रफळ (प्रोरेटा) स्वतंत्ररित्या मिळत होते. एकूण भूखंडावरील २.५ तसेच प्रोरेटा वापरल्यानंतर पालिकेमार्फत ३.५ चटईक्षेत्रफळाची मर्यादा घालण्यात आली. मात्र म्हाडाने पुनर्वसन क्षेत्रफळावर मर्यादा आणल्याने या वसाहतींचा पुनर्विकास रखडला होता. त्यामुळे चटईक्षेत्रफळ वापरावरील मर्यादा उठविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सुधारीत प्रस्ताव तयार करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावानुसार पुनर्वसनाच्या किमान चटईक्षेत्रफळात वाढ करण्याबरोबरच एकूण वापरावर चटईक्षेत्रफळाची मर्यादा न ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. त्याचवेळी चटईक्षेत्रफळाचा जितका वापर होईल त्याच्या प्रमाणात सामान्यांसाठी घरे बांधून घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र त्यास पालिकेकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. आता या प्रस्तावावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे म्हाडावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader