शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कपात केल्याचं समोर आलं आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहने आणि ‘मातोश्री’ निवासस्थान येथील सुरक्षा देखील कमी करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. पण, कोणत्याही प्रकारची सुरक्षा कपात करण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांना ‘झेड’ प्लस आणि आदित्य ठाकरे यांना ‘वाय’ प्लस सुरक्षा आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी बंड रोखलं असतं, पण…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
याबाबत मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आली नाही. त्यांच्या ताफ्यात प्रत्येकी एक अतिरिक्त वाहन होते. ती वाहने हटवली आहेत.”
हेही वाचा : “तीन वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू सांगितलं होतं, पण…”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
तसेच, ‘मातोश्री’बाहेरील सुरक्षेतही कपात केली, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. यावरही पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या ज्या व्यक्तींना संरक्षण आहे. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आली नाही,” असं पोलिसांनी एका निवेदनात सांगितलं आहे. ‘द इकोनॉमिक टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे.