निरीक्षणासाठी मुंबईतील खगोल अभ्यासकांची ग्रामीण भागात धाव
खगोलीय घटनांची पर्वणी अनुभवणाऱ्या हौशी आकाश निरीक्षकांपासून मुंबई शहर आता कायमचे दुरावले आहे. कारण, मुंबईसह देशातील अन्य महानगरांमध्ये प्रकाश प्रदूषणाचा टक्का कमालीचा वाढल्याने येथून आकाश निरीक्षण करणे अशक्य झाले आहे. मुंबईतील अनेकांनी लांबची स्थळे निरीक्षणासाठी गाठली खरी, मात्र तेथेही विकास होत असून एकंदरीत आकाश निरीक्षण दुरापास्त झाल्याने मुंबईकर खगोल अभ्यासकांची हिरमोड होत आहे.
खगोलीय घटनांच्या अनेक शोधांनी जगातील अंधश्रद्धा मोडीत निघाल्यावर या शास्त्राला महत्त्व निर्माण झाले. यातून, अवकाशस्थ वस्तूंचा, ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास सुरू झाला.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील प्रकाश प्रदूषणामुळे हा अभ्यास करणे मुश्कील झाले असून सध्या असे निरीक्षण करण्याची शहरात संधी नसल्याचे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नाशिक ही राज्यातील व देशातील अन्य महानगरे आणि उपनगरांचीही हीच परिस्थिती असून मुंबईपासून शंभर ते दीडशे किलोमीटरचा टप्पा ओलांडून एखाद्या दूरच्या ग्रामीण भागात अथवा गड-किल्ल्यांवर जाऊन आकाश निरीक्षकांना निरीक्षण करावे लागत असल्याचे काही अभ्यासकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धूलिकणांमुळे अधिक प्रदूषण
शहरातील पथदिवे, मॉल्स व दुकानांचे दिवे, मोठय़ा फलकांचे दिवे यामुळे प्रकाशाचे प्रदूषण वाढीस लागले असून वातावरणातील धूलिकणांमुळे आकाशात फेकला गेलेला प्रकाश दुपटीने परावर्तित होऊन आपल्याकडे येतो. त्यामुळे, मुंबईतून चंद्र, मंगळ, शुक्र, गुरू, शनी व काही ठरावीक तारे वगळता अवकाशस्थ वस्तू पाहणे कठीण झाले आहे. असे प्रकाश प्रदूषण या विषयावरील अभ्यासक अभय देशपांडे यांनी सांगितले.
अभ्यासक संस्थांची मुंबई बाहेर धाव
मुंबईत टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था व खगोल मंडळ आदी संस्थाकडून विद्यार्थी व हौशी निरीक्षकांसाठी आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येतात. खगोल मंडळामार्फत १९८५ ते २०१२ या काळात मुंबईपासून दूर वांगणी येथे दर महिन्याला आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम करण्यात आले. मात्र, येथे प्रकाश वाढू लागल्याने २०१४ पासून आत्तापर्यंत नेरळ व बदलापूरजवळील उमरोली येथे निरीक्षणाचे कार्यक्रम करावे लागत आहेत, असे अभय देशपांडे यांनी सांगितले. तर, एकंदरीत मुंबई शहरात वाढणारे प्रकाश प्रदूषण व त्याला साह्य़ीभूत ठरणारे धूलिकणांचे प्रदूषण यामुळे मुंबईतील आकाश निरीक्षणावर मुख्यत्वे परिणाम झाला. यासाठी आम्ही गेली काही वर्षे राज्याच्या अन्य भागात निरीक्षणाचे कार्यक्रम करतो आहोत. त्यामुळे प्रकाश प्रदूषणावर डाऊन लाइट्ससारखे पर्याय अमलात आणून मात करण्याची आवश्यकता आहे, असे टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेचे सुरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
कोणत्या घटनांना मुकणार?
आगामी वर्षभरात येणारे लायरीड्स, डार्कोनिड्स, ओरिओनाइड्स, टॉरिड्स, जेमिनाइड्स आदी उल्का वर्षांव होणार असून त्यासाठी रात्रीचे आकाश स्वच्छ व प्रदूषणविरहित असणे आवश्यक आहे. तसेच, रोजच्या आकाशातील अवकाशस्थ वस्तू, चंद्र ग्रहणे, खगोलीय घटकांचा एकंदर अभ्यास व अन्य दुर्मीळ अवकाशस्थ घटनांना मुंबईकर मुकण्याची शक्यता आहे.