केंद्रात व राज्यात सत्ताबदलानंतर भाजप सरकार आणि संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आघाडी घेतली. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांशी उभा वैचारिक दावा सांगणाऱ्या दलित लेखक, साहित्यिक, विचारवंतांचाही त्यास हातभार लागला. दुरावलेल्या दलित समाजाला जवळ करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे नव्याने प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे.
केंद्रात व राज्यात काँग्रेसच्या जागी भाजपचे सरकार आले आणि १४ एप्रिलला आंबेडकर जयंती कधी नव्हे इतकी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. त्यात केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संबंधित अन्य संघटनांनी विशेष पुढाकार घेतला. राज्यात ८ ते १४ एप्रिल असा सरकारच्या वतीने सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. सातही दिवस बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणाऱ्या लहान-थोर वृत्तपत्रांमध्ये पान-पानभर जाहिराती झळकल्या. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पहिल्यांदाच गेटवे ऑफ इंडिया येथे आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
संघ परिवाराशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दोन दिवस विविध विचारवंतांची व्याख्याने आयोजित करून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. त्यातील एक वक्ते म्हणून केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांची उपस्थिती विशेष मानली जात आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुढाकाराने व साहित्य अकादमीच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त दिल्लीत देशातील निवडक दलित साहित्यिकांचे संमेलन घेण्यात आले. त्याला एकेकाळचे दलित पँथरचे नेते, कवी आणि हिंदुत्ववादी संघटनांशी आक्रमकपणे वैचारिक संघर्ष करणारे ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, लक्ष्मण गायकवाड, नामदेव कांबळे, विजय सुरवाडे आदी दलित चळवळीतील लेखकमंडळी उपस्थित होती. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे होते. दिल्लीत रा. स्व. संघाच्या वतीने अन्यत्र आयोजित एका कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर काढलेल्या दोन विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमालाही डॉ. नरेंद्र जाधव यांनी हजेरी लावली.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत, दलित साहित्यिक-कार्यकर्त्यांना हाताशी धरून जातिव्यवस्थेमुळे दुरावलेल्या दलित समाजाला जवळ करण्याचा संघ परिवाराचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा