मुंबई : मुंबई करोना, हिवताप, डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराचे संकट कायम असताना आता संसर्गजन्य अशा डोळ्यांच्या आजाराची साथ आली आहे. अनेकांना डोळे लाल होणे आणि डोळ्यांना सूज येणे असा त्रास होत आहे. डोळ्यांच्या रुग्णालयातील आणि नेत्र तज्ज्ञांकडील रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने डोळ्यांच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, पण त्यामुळे डोळ्यांची साथ आली आहे असे म्हणता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी रुग्णांना सौम्य लक्षणे असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>> मुंबई : नाल्यात खचलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा
हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वातावरणात मोठे बदल होत आहेत. मध्येच पडणारे कडक उन्ह आणि अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण असे बदल सातत्याने होत आहे. याचा परिणाम म्हणून डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याचे नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. राकेश शहा यांनी सांगितले. डोळ्यांत पाणी येणे, घाण येणे, डोळे लाल होणे, जळजळ होणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने कुटुंबातील अनेकांना त्रास होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि कोणतेही लक्षणे जाणवल्यास त्वरित नेत्रविकार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावेत. मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत वा डोळ्यात कोणतेही औषध टाकू नये, असे अवाहनही डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतं? प्री- डिनरने वजन नियंत्रणात मदत होते का? जाणून घ्या
पालिका मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार
गेल्या चार-पाच दिवसांत डोळ्यांच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पण ही डोळ्यांची साथ आहे असे तूर्तास तरी म्हणता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना अंत्यत सौम्य संसर्ग दिसून येत आहे. दोन – तीन दिवसांत साध्या उपचाराने रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबरोबरच या आजारासंबंधीची मार्गदर्शक तत्वे मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच जाहीर करण्यात येतील.
मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका
ही काळजी घ्या
– डोळ्याला हात लावू नये
– डोळ्याला हात लावल्यास स्वच्छ धुवावेत.
– रुमालाने डोळे चोळू नयेत.
– स्वतंत्र टॉवेल वापरावा.
– डोळे आल्यास घरीच बसावे.
– शक्य असल्यास कुटुंबियांपासून वेगळे राहावे.
लक्षणे
– डोळे लाल होणे आणि पिवळसर द्राव डोळ्यातून येणे
– डोळे सतत चोळावेसे वाटणे
– दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे
– पापण्या एकमेकांना चिकटणे
– डोळ्यात टोचणे
– डोळ्यातून सतत पाणी येत राहणे