प्रभागफेरी : एफ उत्तर

अंतर्गत भाग : माटुंगा, शीव, िहदू कॉलनी, वडाळा, अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

नियोजन आराखडा करून त्यानंतर बांधण्यात आलेल्या हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी यासारख्या सर्वात जुन्या वसाहती आणि दुसरीकडे कोरबा मिठागरावर भराव टाकून उभे राहिलेले झोपडय़ांचे जाळे ही एफ उत्तर विभागाची दोन टोके. शीव येथील पुरातन किल्ला, पालिकेचे शीव रुग्णालय, प्रसिद्ध गांधी मार्केट, नव्याने वसलेले प्रतीक्षा नगर, वारसास्थळांमध्ये समावेश असलेले फाइव्ह गार्डन याच परिसरात येतात.

या प्रभागातील सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येपैकी ५० टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्या झोपडपट्टय़ांमध्ये राहते. अनधिकृत असल्याचा शिक्का बसल्याने या वस्त्यांमध्ये जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या, कचरा व्यवस्थापन, रुंद रस्ते या मूलभूत गरजांचीच वानवा आहे. मतांच्या मोबदल्यात अनधिकृत घरांना आसरा देण्यापलीकडे या भागात राजकीय हस्तक्षेप नाही.

काही भागात शौचालय, पाण्याची वाहिनी, गटारबांधणी अशी कामे झाली आहेत, पण नियोजनबद्ध विकासाचा श्रीगणेशा होण्यासाठीही अनेक वर्षे जातील, अशी स्थिती आहे. दुसरीकडे ८० वर्षांहून जुन्या हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी यांच्या पुनर्विकासाचा गुंता आहे.

राजकीय समीकरण

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, पालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि माजी महापौर श्रद्धा जाधव याच विभागात असून दहापैकी चार नगरसेवक शिवसेनेचे आहेत. या भागावर शिवसेनेची पकड आहे. मात्र त्याचवेळी सायन कोळीवाडा या भागात भाजपचे तामिळ सेल्वन आणि वडाळा येथे काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत. अर्थात कोणत्याही पक्षाच्या कार्यकाळात या भागाचा नियोजनबद्ध विकास झालेला नाही. शिवसेनेसोबत भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन तर एक अपक्ष नगरसेवक या विभागात आहे.

untitled-2

वारसास्थळ

हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी या वसाहती ८० वर्षे जुन्या. ऑगस्ट २०१२ मध्ये महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पुरातन वारसास्थळांमध्ये या वसाहतींचा सरसकट प्रवेश झाल्यावर जोरदार विरोध झाला. एकीकडे उंच इमारती बांधण्यासाठी विकासक पुढे येत असताना पुरातन श्रेणी लागल्याने बांधकामावर मर्यादा आल्या. नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने मलबार हिलपासून माटुंगापर्यंतच्या रहिवासी इमारती, वास्तू या यादीतून वगळल्या. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याने पुरातन वारशापेक्षाही राजकीय समीकरणे अधिक महत्त्वाची ठरली.

 

पाणीपुरवठा

झोपडय़ा अनधिकृत असल्या तरी त्यांना पाणी द्यावेच लागेल या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी पूर्ण होण्यासाठी आणखी काही काळ लागेल. राजकीय आशीर्वादाने रोज उभ्या राहत असलेल्या झोपडय़ांना पिण्याच्या पाण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. अनेक ठिकाणी चाळींमध्ये एकच नळ असल्याने वादविवाद होतात. पाणीचोरीच्या घटनाही घडतात. त्यातच गटाराशेजारून जात असलेल्या जलवाहिन्यांमधून गढूळ पाणी येण्याच्या घटनाही अगदी सामान्य आहेत. सार्वजनिक शौचालयांमधील पाणीपुरवठय़ासाठीही पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत

अनधिकृत बांधकाम

एका रात्रीत भराव टाकून त्यावर उभ्या राहणाऱ्या झोपडय़ा, झोपडय़ांवर चढणारे मजले यांचे पेव या विभागात फुटलेले आहे. जेवढी अधिक घरे तेवढे अधिक मतदार असा हिशोब असल्याने कोणताही राजकीय पक्षा याविरोधात आवाज करत नाही. मात्र अनधिकृत बांधकामांमुळे या विभागातील प्रशासकीय सेवांवर ताण पडतो आणि आधीच लंगडत असलेले व्यवस्थापन खिळखिळे होते.

प्रतीक्षा नगर, माटुंगा या भागात रुंद रस्ते आहेत. मात्र वडाळासारख्या काही रस्त्यांवरून जात असलेल्या मोनोरेलची रुंदीही खालच्या रस्त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवरून रिक्षा जाणेही अवघड होते. त्यातच हा डोंगराळ भाग असल्याने रस्त्यांना उतार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवरील डांबर निघून वाहतुकीची अवस्था अगदीच बिकट होते.

स्वच्छतागृह

शहर हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी या भागात आजही अनेक ठिकाणी शौचालयांची वानवा आहे. वडाळा, शीव परिसर, मिठागराच्या जागेवर भराव टाकून पसरलेल्या वस्त्यांमध्ये शौचालयांची संख्या वाढली आहे. मात्र या परिसरात मलनिसारण वाहिन्याच नसल्याने पालिकेला सेप्टिक टँक उपलब्ध करून द्यावे लागले. सांडपाणी व्यवस्थाच नसल्याने अनेक घरे व चाळी इच्छुक असूनही तिथे शौचालये बांधण्यास आडकाठी येते. त्यामुळे या विभागातील सुमारे अडीच लाख लोकसंख्या सार्वजनिक शौचालयांवर पूर्णत अवलंबून आहे. अँटॉप हिलसारखा परिसर हा एमएमआरडीएच्या ताब्यात असल्याने तिथे विशेष सोयी सुविधा देता येत नाहीत असे लोकप्रतिनिधी सांगतात.

कचरा व्यवस्थापन

एकीकडे हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी परिसरात सुका-ओला कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रयोग सुरू झालेले असताना वॉर्डच्या उर्वरित भागात मात्र रोजचा कचरा उचण्याचीच समस्या आहे. कोरबा मिठागर, गणेश नगर, हिम्मत नगर अशा भागात दत्तक वस्ती योजनेअंतर्गत काही संस्थांकडे कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे.

untitled-3

मोकळ्या जागा, मैदाने

पुरातन वारसाश्रेणीमध्ये स्थान असलेले फाइव्ह गार्डन या वॉर्डमध्ये आहे. तीन वर्षांपूर्वी या बागांचे नूतनीकरण करण्यात आले. या बागेच्या आजूबाजूच्या परिसरातही चांगले पदपथ व रुंद रस्ते आहेत. मात्र वडाळा, शीव या भागात याच्या विरुद्ध स्थिती आहे. मोकळ्या जागांची संख्याच फारशी नसल्याने ते विकसित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पाणी तुंबणे

शहराचा आकार हा बशीप्रमाणे असल्याचे म्हटले जाते. या बशीचा मध्यभाग एफ उत्तर विभागात येतो. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यातच कचऱ्याने भरलेले नाले व गटारे यामुळे पाण्याचा निचराही वेळेत होत नाही. हिंदमाताप्रमाणेच किंग्ज सर्कल या भागातही दर पावसाळ्यात पाणी तुंबते. पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने उदंचन केंद्र सुरू केल्यामुळे या वर्षी जोरदार पाऊस पडून हिंदमाताला पाण्याचा निचरा लवकर झाला.

प्रतीक्षानगरमध्ये म्हाडाची संक्रमण शिबिरे आहेत. या इमारती तात्पुरत्या स्वरूपात बांधल्या असून सांडपाणी व्यवस्थाही यथातथाच आहेत. गटाराची झाकणे तुटल्याने दुर्गंधी पसरते. दोन इमारतींमध्ये कचरा साठलेला असतो. घुशींचे साम्राज्य वाढले आहे. बाजूलाच वाहणाऱ्या नाल्यामुळे व खाजण जमिनीमुळे डासांचा उपद्रव आहे. रात्री उशिरा सुरक्षितपणे बाहेर पडता येत नाही. याचमुळे या भागातील दुकानेही साडेदहापर्यंत बंद होतात.  लहानसहान आजारांसाठीही शीव रुग्णालयात जावे लागते.

अँटॉप हिलमधील मुलांना वडाळ्यातील शाळांमध्ये जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग व चार मोठे रस्ते ओलांडावे लागतात. या ठिकाणी पादचारी पुलाची मागणी गेली २० वर्षे होतेय. दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. मात्र अद्यापि या पुलाचे काम सुरू झालेले नाही. अँटॉप हिलच्या पदपथांवर दुकाने आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांनी अतिक्रमण केले आहे. मुलांना खेळण्यासाठी एकही उद्यान नाही. राजकीय वरदहस्तामुळे वाढलेल्या बहुमजली झोपडय़ांमुळे आकाशही दिसेनासे झाले आहे. नगरसेवक केवळ नाले, पायवाटा करणे, शौचालये बांधणे या कामापुरतेच असून या परिसरातील तरुणांची व्यसनाधीनता, शिक्षण तसेच पर्यावरणावर विचारही केला जात नाही.

शिवाजी फणसेकर, अँटॉप हिल