मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमध्ये उपस्थिती दर्शविण्यासाठी आता ‘फेस रीडिंग’ पद्धतीची (चेहरा-आधारित आधार प्रमाणीकरण) अंमलबजावणी करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. १ मेपासून ही पद्धत लागू करण्यात येणार आहे. प्राध्यापकांना व अन्य कर्मचाऱ्यांना भिंतीवर बसवलेल्या उपकरणाद्वारे फेस रीडिंगबरोबरच मोबाइल अॅपद्वारेही उपस्थिती नोंदवता येणार आहे.
वैद्याकीय महाविद्यालये व संस्थांमध्ये उपस्थितीसाठी फिंगरप्रिंट आधारित आधार सक्षम बायोमेट्रिक प्रणाली वापरण्यात येते. आता ३० एप्रिलपासून ही प्रणाली बंद करण्यात येणार असून त्याऐवजी १ मेपासून फेस रीडिंग पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याचे निर्देश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिले आहेत. यामध्ये डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना भिंतीवर बसवलेल्या उपकरणांबरोबर मोबाइल अॅपद्वारे उपस्थिती दर्शविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख यांचे चेहऱ्याचे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्याची सर्व माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा प्राचार्य यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह पाठवावे, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
मोबाइल अॅपद्वारेही उपस्थितीची नोंद
मोबाइल अॅपद्वारे उपस्थिती नोंदविण्यासाठी संबंधितांना जीपीएसद्वारे ठिकाणाची माहिती शेअर करावी लागणार आहे. वैद्याकीय महाविद्यालयापासून १०० मीटरच्या परिघातच मोबाइलद्वारे उपस्थिती नोंदविता येणार आहे, मात्र यासाठी वैद्याकीय महाविद्यालयांना जीपीएसच्या निर्देशांकाची माहिती आयोगाला देणे बंधनकारक आहे.
३० एप्रिलपर्यंत तांत्रिक अडचण दूर
महाविद्यालयांना तांत्रिक समस्या आल्यास, ३० एप्रिल २०२५ पूर्वी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तांत्रिक विभागाला कळवावे. तसेच, सर्व वैद्याकीय महाविद्यालये आणि संस्थांच्या अधिष्ठाता किंवा प्राचार्यांकडून हे अॅप प्राध्यापकांच्या मोबाइलमध्ये सक्रिय केल्याची खात्री करणे अपेक्षित आहे.