शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळल्या गेलेल्या बंदवर एका तरुणीची फेसबुकवरील प्रतिक्रिया, त्यावर उमटलेले तीव्र पडसाद, पोलिसांची न्यायालयीन कारवाई व त्याविरुद्ध उमटलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हुंकार, पोलिसांची पंचाईत आणि सरकारची कोंडी यांमुळे देशात नवे वादळ उठले आहे.
बंदबाबत नापसंती व्यक्त करणारी ती नोंद समाजात एवढे वादळ निर्माण करील याची पुसटशीदेखील कल्पना नसलेल्या त्या तरुणीने तर आता फेसबुकचाच धसका घेतला आहे, तर फेसबुकसारख्या माध्यमांद्वारे आपली मते व्यक्त करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या कृतीवर फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियामधूनच टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही या प्रकारामुळे संतप्त झाले असून, या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यावर संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे समजते. ज्या माहिती तंत्रज्ञान कायद्याचा आधार घेऊन पोलिसांनी कारवाई केली, त्यावरून त्यांचे या कायद्याविषयीचे अज्ञानच स्पष्ट झाले असून हा कायद्याचा गैरवापर असल्याची टीका केंद्रीय मंत्र्यांपासून कायदेतज्ज्ञांपर्यंत सर्वाकडून होऊ लागली आहे. पोलिसांनी या कायद्याचा गैरवापर केला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक झालीच पाहिजे, असे ठाम मत केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरही ट्विटरवरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्या तरुणीच्या नोंदीनंतर पोलिसी कारवाईच्या निषेधाचा तीव्र सूर या माध्यमांमधूनच उमटला, सिब्बल यांनीही कारवाईचा धिक्कार केला, पण शिवसेनेतून मात्र त्याचे जोरदार समर्थनच होत होते.
शाहीनला ‘फेसबुक’चा धसका
मुंबई : जे काही झाले, त्यानंतर ‘यापुढे ‘फेसबुक’चे नावच काढणार नसल्याचे शाहीन धाडा हिने म्हटले आहे, तर तिच्या प्रतिक्रियेवर ‘लाईक’ करणाऱ्या रेणू श्रीनिवास हिनेही, ‘फेसबुक’वर कुठलीही प्रतिक्रिया देताना दोन वेळा तरी विचार करेन, असे म्हटले आहे
तोडफोड ही शिवसैनिकांची उत्स्फूर्त भावना होती. या तरुणीसारखा मस्तवालपणा पुन्हा कुणी करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. – प्रभाकर राऊळ, शिवसेना ठाणे (ग्रामीण) जिल्हाप्रमुख
वादळ प्रतिक्रियांचे
* रुग्णालय तोडफोडीचे शिवसेनेकडून समर्थन
* पोलिसांनी कायद्याचा गैरवापर केल्याची सिब्बल यांची टीका
* सोशल मीडियातून टीकेचा भडिमार, सिब्बलही लक्ष्य
* तोडफोड करणाऱ्या १० जणांना जामीन