शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळण्यात आलेल्या बंदबद्दल ‘फेसबुक’वर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या दोन मुलींच्या अटकेचे प्रकरण ठाणे ग्रामीण पोलिसांना भलतेच महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा अहवाल मागविला असून, त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीचा राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी सांगितले.  
बंदच्या विरोधात फेसबुकवर मत व्यक्त करणारी शाहिन धाडा ही पालघर येथील तरूणी आणि त्याला सहमती दर्शविणारी तिची मैत्रीण रेणू श्रीनिवासन यांना पालघर पोलिसांनी अटक केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उपटले होते. केंद्रानेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही या प्रकाराबद्दल संतप्त झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुखविंदर सिंग यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीचा अहवाल राज्य शासनास मिळाला असून, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव त्याचा अभ्यास करीत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि अटकेची कारवाई चुकीची असून त्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी शिफारसही या अहवालात केल्याचे समजते.

Story img Loader