माहिती तंत्रज्ञान कायद्यातील त्रुटींवरच बोट ठेवणाऱ्या आणि राज्यात खळबळ माजविणाऱ्या फेसबुक प्रकरणी पालघर येथील दोन्ही तरुणींवरील  गुन्हे मागे घेऊन हे प्रकरण निकालात काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघरच्या शाहिन धीडा या तरुणीने फेसबुकवरील प्रतिक्रियेत मुंबई बंद विरोधात मतप्रदर्शन केले होते. याला तिची मैत्रिण रेणू हिने पाठिंबा दिल्याने शिवसेनेत संताप पसरला होता. शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर पालघर पोलिसांनी या दोघींच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली होती. या मुलींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करणार नसल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी सांगितले. मुंबईत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या दोन्ही तरुणींच्या अटकेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले होते. गृहखात्याने कोकण विभागीय परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुखबिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. त्याच्या अहवालानुसार ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक रवींद्र सेनगावकर आणि पालघरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आले होते.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook matter closed