तुम्ही केलेली फेसबुक पोस्ट जर ‘पब्लिक’ या पर्यायावर असेल, तर ती यापुढे मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या गुगल सर्चमध्येही दिसणार आहे. यापूर्वी फेसबुक प्रोफाइल गुगल सर्चमध्ये दिसत होत्या. मात्र आता प्रोफाइलसह पोस्टही सर्चमध्ये दिसू लागणार आहेत.
यामुळे आता तुम्ही केलेली फेसबुक पोस्ट फेसबुक न वापरणाऱ्यांनाही गुगल सर्चच्या माध्यमातून दिसू शकणार आहे. अल्फाबेट या गुगलच्याच सहकंपनीच्या प्रवक्त्याने नुकतेच हे स्पष्ट केले. हे केवळ अँड्रॉइड फोन्सवर दिसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये जर गुगल सर्च करणाऱ्यांनी ‘पेट्रोल’ असा शब्द शोधला तर त्या संदर्भात असलेल्या सर्व फेसबुक पोस्ट व त्या पोस्ट करणाऱ्यांचे प्रोफाइल समोर येणार आहे. यापूर्वी जर आपण एखाद्या व्यक्तीचे नाव गुगलवर शोधले तर त्याच्या फेसबुक खात्याची लिंक आपल्याला सर्च पर्यायावर दिसायची. त्या लिंकवर आपण क्लिक केल्यावर आपण फेसबुक अ‍ॅपमध्ये न जाता फेसबुकच्या संकेतस्थळावर जायचे आणि तेथे आपल्याला त्या व्यक्तीचे प्रोफाइल पानच दिसायचे. पण आता त्या व्यक्तीने केलेल्या पोस्टही दिसू लागणार आहेत. फेसबुकच्या सेटिंगमध्ये आपण आपले प्रोफाइल, पोस्ट या सर्वाना दिसाव्यात असा पर्याय निवडला असेल तर त्या पोस्ट गुगल सर्चमध्ये दिसणार आहेत. गुगलने नुकतेच ट्विटरसोबत करार केला असून, तेव्हापासून सर्चमध्ये ट्वीट्स दिसणे शक्य झाले आहे.

Story img Loader