यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या तब्बल १० कोटींच्या आसपास आहे. यातील बहुतांश नवमतदारांना समजणारा परवलीचा शब्द म्हणजे ‘लाइक’. आपल्या फेसबुक पेजला किती ‘लाईक्स’ आहेत यावर त्यांचे ‘सोशल स्टेटस’ ठरत असते. हे लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांच्या चतुर ‘सोशल मिडिया मॅनेजर्स’नी आपापल्या पक्षाच्या वा नेत्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटसना जास्तीतजास्त ‘लाइक्स’ मिळावीत, अशी व्यवस्था करण्याचे मनावर घेतले आहे. गंमत म्हणजे त्यासाठी जो कोणी अधिक ‘लाइक्स’ आणेल त्याला अधिक पैसे असा सरळ (रोकडा) व्यवहार केला जात आहे. एका ‘लाइक’साठी ३ रुपयांपासून थेट १०० रुपयांपर्यंत रक्कम मोजली जात आहे. स्वाभाविकच नेत्याच्या अथवा पक्षाच्या प्रोफाईलला अधिकाधिक ‘लाइक्स’ मिळतील, अशी ग्वाही देणाऱ्या कंपन्यांना ‘मूँह माँगी’ रक्कम मिळत आहे.
निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर नवा नसला तरी यासाठी खास कंपन्या नेमून त्यांच्याकरवी सर्व कामे करून घेणे, प्रचारातील प्रत्येक क्षणाची खबर फेसबुक, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपलोड करणे हे प्रकार मात्र यंदा जोरात सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी काही प्रस्थापित कंपन्या पुढे आल्या आहेत. या कंपन्यांनी राजकारणी मंडळींना आकर्षक पॅकेजेस देऊ केली आहेत. यामध्ये महिना ५० हजार ते अडीच लाख रुपयांची उलाढाल होत आहे. हे दर विविध सोशल माध्यमांमधून त्या व्यक्तीचे प्रमोशन करण्यासाठीच आकारले जातात. हे सर्व व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांना किंवा कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला ‘ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजर’ असे म्हटले जाते.

पॅकेजेस कशी आहेत?
* कमीत कमी पैशाच्या पॅकेजमध्ये त्या व्यक्तीचे फेसबुक प्रोफाइल तयार केले जाते. त्याचे एक पेजही बनविण्यात येते. यावर लाइक्स मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
* या ‘लाइक्स’चेही दर आकारले जातात. सामान्य व्यक्तीच्या लाइक्सला तीन ते पाच रुपये आकारले जातात. तर सेलिब्रेटी किंवा इतर मान्यवर व्यक्तींच्या लाइक्ससाठीचे दर ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहेत.
* फेसबुक पेजवर सातत्याने विविध पोस्ट केल्या जातात. यातीलच काही पोस्ट या त्या नेत्याच्या ट्विटर अकाऊंटवरही केल्या जातात.
* ती व्यक्ती जर प्रसार माध्यमांसमोर काही बोलली तर त्याचे व्हिडिओ मिळवून तेही फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर अपलोड केली जातात.
* ‘लाइक्स’ वाढवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
* ब्लॉग, वेबसाइटही तयार करून त्याही सातत्याने अपडेट केल्या जातात. दिवसाला किमान २० लाइक्स पासून ते २०० लाइक्सपर्यंतची विविध पॅकेजेस या कंपन्यांकडे आहेत.

कंपन्यांचे काम कसे चालते?
कंपन्यांचे हे काम बीएमएम उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मार्फत होत असते. यामध्ये काही तांत्रिक तज्ज्ञही असतात. बीएमएमच्या विद्यार्थ्यांकडून मजकुर तयार करण्यापासून तो पोस्ट करण्यापर्यंतचे काम करून घेतले जाते. त्या व्यक्तीचे वृत्त वाहिन्यांवरील व्हिडिओज मिळवण्यासाठी काही रेकॉर्डिग कंपन्यांशी टायअप केलेले असते. फेसबुकवर अ‍ॅडवर्डही तयार केले जाते. यामध्ये तुम्हाला ज्या लोकांपर्यंत पोहचायचे आहे त्यांच्यापर्यंत योग्यवेळी पोहचू शकतात. अ‍ॅडवर्ड तयार करताना तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स निवडावा लागतो. त्यानुसार फेसबुक तशी व्यक्तींचे प्रोफाइल सुरू झाले की बाजूला पॉप अप करते. याशिवाय लाइक्स आणि रिट्विट मिळवण्यासाठीही काही वेबसाइट्सची मदत घेतली जाते. मात्र याबाबत अधिकृतपणे बोलण्यास कुणीही तयार होत नाही.

Story img Loader