लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष व्यवस्था केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. तर, ६ डिसेंबर रोजी प्रवाशांची संख्या ९० ते ९५ लाखावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीचे विभाजन करण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये अनुयायांसाठी विश्रांती कक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि दादर स्थानकांत एकाच वेळी १० ते १२ हजार अनुयायांना थांबता येईल, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे ऑक्टोबर २०२४ मध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत १० जण जखमी झाले. तर, एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेऊन कडक बंदोबस्त ठेवला. या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पोलीस ताफा, कर्मचारी वर्ग आणि अतिरिक्त सुरक्षा विभाग तैनात केला आहे. राज्यासह देशातून येणारे अनुयायी दादर किंवा सीएसएमटी रेल्वे स्थानकांत उतरून थेट चैत्यभूमीवर जातात. त्यामुळे पादचारी पूल, रस्ते, रेल्वे स्थानकांत गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर आणि सीएसएमटी स्थानकातच गर्दीचे नियोजन व्हावे, यासाठी अनुयायांना तात्पुरत्या स्वरुपास विश्रांती घेण्याकरीता थांबा तयार केला आहे. सीएसएमटी येथे फलाट क्रमांक ७-८ च्या समोरील भागात दोन हजार अनुयायांना थांबता येईल, अशी व्यवस्था केली आहे. तर, मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या दादर स्थानकात ८ ते १० हजार अनुयायांना थांबता येईल, अशी सोय केली आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करणे शक्य होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्निल निला यांनी दिली.
आणखी वाचा-रेल्वे परिसरात हरवलेल्या ५३८ मुले स्वगृही रवाना
मदत कक्ष आणि विशेष तिकीट आरक्षण कक्ष
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांतर्फे २४ तास मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. ५ ते ७ डिसेंबर दरम्यान अनारक्षित तिकिट विक्रीसाठी आणि रेल्वेगाड्यांच्या माहितीसाठी दोन यूटीसी कक्ष तयार करण्यात आले आहेत. यासह दादर, सीएसएमटी, कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस कक्ष उघडण्यात आले आहे.
अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दादर येथे २२३, सीएसएमटी येथे १६६, एलटीटी येथे १०५, ठाणे येथे १०३ आणि कल्याण येथे ७८ असे एकूण ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासह दादर येथे १२०, सीएसएमटी येथे ४० आणि कल्याण येथे ३० अशा दोन पाळ्यांमध्ये आरपीएफचा कर्मचारी तैनात असणार आहे. तर, दादर येथे २५० हून अधिक आणि सीएसएमटी ८० हून अधिक रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका सज्ज
दादर स्थानकाच्या प्रमुख ठिकाणी प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी ‘वे टू चैत्यभूमी’, ‘वे टू राजगृह’ असे २१४ फलक लावण्यात आले आहेत. यासह रेल्वेगाड्यांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले आहेत. विशेष रेल्वेगाड्यांबाबत वारंवार उद््घोषणा केली जाणार आहे. दादर येथील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने दादरच्या मध्यवर्ती पुलावर आणि पालिका पुलावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासह पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था, व्हील चेअर, स्ट्रेचर आणि पुरेशा खानपानाची सुविधा उपलब्ध केली आहे.