मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्थापन केलेल्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यावर सुविधांचा वर्षाव करण्यात आला आहे. अध्यक्षांना महिना साडेचार लाख रुपये, तर सदस्यांना चार लाख रुपये मानधन, विमान प्रवास भाडे, वाहन, कर्मचारी वर्ग, स्वंतत्र कार्यालय इत्यादी भरघोस सुविधा देण्यात येणार आहेत. शिवाय चोवीस तास त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व इतर न्यायालयांत प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये शासनास कायदेशीर बाबीसंदर्भात मार्गदर्शनपर सल्ला देण्यासाठी निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड व निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे सदस्य आहेत. मंडळाचे कामकाज ९ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा : गोष्ट मुंबईची, भाग १४२: भूराजकीय महत्त्वाचे गेटवे ऑफ इंडिया आहे तरी कुठे?

राज्य सरकारने मंडळाचे अध्यक्ष न्या. भोसले यांना दरमहा साडेचार लाख रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सदस्य न्या. गायकवाड व न्या शिंदे यांना प्रत्येकी चार लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन सल्लागार मंडळ कार्यरत असेपर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे.

हेही वाचा : लंडनहून वाघनखे मुंबईत येण्यास विलंब; नोव्हेंबर, जानेवारीचा वायदा चुकला, आता मे महिन्याचा मुहूर्त

सल्लागार मंडळाला कार्यालयासाठी दक्षिण मुंबईत ६००० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यायची आहे. त्याचबरोबर मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी वर्ग, साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सल्लागार मंडळास साहाय्य करण्यासाठी अॅड. अभिजित पाटील, अॅड. अक्षय शिंदे, अॅड. वैभव सुगदरे, अॅड. अजिंक्य जायभाये या कायदेतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनाही मानधन, प्रवास भत्ता व इतर आनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी (४ जानेवारी) त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे.

हेही वाचा : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतही गुन्हा दाखल

सुविधा काय?

मानधनाव्यतिरिक्त अध्यक्ष व सदस्यांना पूर्णवेळ वाहन व वाहनचालक, पेट्रोलचा खर्च, त्यांना कामानिमित्त विविध ठिकाणच्या दौऱ्याकरिता विमान प्रवास भाडे, शासकीय दौऱ्यावर असताना राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांची शासकीय विश्रामगृहात निवासाची व भोजनाची व्यवस्था करायची आहे. मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांना त्यांच्या राहत्या घरी तसेच शासकीय दौऱ्यादरम्यान व वैयक्तिक कामानिमित्त दौऱ्यावर असताना चोवीस तास सुरक्षा व्यवस्था पुरवायची आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facilities maratha reservation advisory board 4 lakhs remuneration air travel separate office mumbai print news css