परळ रेल्वे स्थानक
आपण राहत असलेल्या ठिकाणाहून आपण काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत रेल्वेने प्रवास करायचा हा मुंबईकर चाकरमान्यांचा नेमच; पण कधी तरी अचानक आपल्या नियमित स्टेशनांपेक्षा वेगळय़ाच कुठल्या तरी स्थानकावर जाण्याची वेळ येते आणि आपण हरवून जातो. यामुळे शहरातील रेल्वे स्टेशन परिसराची ओळख करुन देणारे हे सदर.
परळ रेल्वे स्थानक. या स्थानकातून बाहेर पडल्यावर प्रथम दृष्टीस पडतो तो फेरीवाल्यांनी गजबजलेला परिसर.. पूर्वेला एलफिन्स्टन रोड स्थानक, तर पश्चिमेला परळचा भाग, यामुळे परळला जाणाऱ्या साऱ्यांचीच पश्चिमेकडे धावपळ. एलफिन्स्टन भागात उंचच इमारती, तर परळ भागात साध्या एक मजली ते दुमजली इमारती. यामुळे आधुनिक मुंबई समोर दिसत असतानाही परळ स्थानकाने आपले छोटेखानी मराठमोळे रूप अबाधित राखले आहे. तसेच हा भाग मराठीबहुल असून निम्न-मध्यमवर्गीय नागरिक येथे राहत असल्याने सामान्यांचीच गर्दी येथे आढळून येते. सध्याच्या उन्हाळी वातावरणातून आलेल्याला स्थानकातून बाहेर पडताना गारव्याचा सुखद आनंद जाणवतो, कारण भेंडीच्या आठ-दहा व वडाच्या दोन-तीन वृक्षांनी हा संपूर्ण परिसर आच्छादून गेल्याने उन्हातून आलेल्या माणसाच्या डोळ्यांना आराम व थंडावा जाणवल्याशिवाय राहत नाही, मात्र स्थानकाबाहेरील या हिरवळीच्या रस्त्याचा अनधिकृत झोपडीधारक, फेरीवाले व अवैध वाहनतळ यांनी फायदा घेतला आहे. फेरीवाल्यांची ही जत्रा थेट सरळ अत्यंत जुन्या जगन्नाथ भातणकर पुलाला जाऊन भिडते व पुलाच्या अंतासह जाऊन संपते.
चांगली खाद्य ठिकाणे
परळ स्थानकातून बाहेर पडल्यावर काही अंतर पुढे गेल्यावर २० ते ३० रुपयांत खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे अन्नदाता झुणका भाकर केंद्र चिंचोळ्या जागेत असूनही भरून गेलेले असते. तसेच, थोडे पुढे असलेले कामत शुद्ध शाकाहारी हॉटेल व त्याही पुढे आणि हिंदमाता पुलाजवळ असलेले गौरीशंकर मिठाईवाला ही खवय्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आवडती खाद्यकेंद्रे आहेत.
चाळ परिसरातील फेरफटका
मुंबईतील चाळ संस्कृती संपुष्टात येऊ लागली आहे. मात्र परळ भागात आजही काही चाळी आपले अस्तित्व टिकून आहेत. मुंबईची चाळ संस्कृती पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच या परळ स्थानक परिसरातील चाळींना भेट देऊ शकता; पण या चाळी तुम्हाला आता उत्तुंग इमारतींमधून शोधाव्या लागतात हे मात्र खरे.
रुग्णांसाठी जवळचे स्थानक
परळ स्थानकापासून टाटा कर्करोग रुग्णालय, के.ई.एम. व वाडिया रुग्णालय आणि हाफकिन संस्था १५-२० मिनिटांच्या अंतरावर असल्याने रुग्ण येथूनच रुग्णालयांकडे जातात. मात्र, रुग्णांना वाहतुकीसाठी स्वत:चीच सोय करावी लागत असल्याने अनेकांची आबाळ होताना दिसते.
रेल्वेमय परिसर
परळ स्थानकाबाहेरील बराच भाग परळ रेल्वे वर्कशॉपने व्यापून टाकला आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरीनेच रेल्वेची दुरुस्तीची कामे येथे मोठय़ा प्रमाणावर चालतात. जवळपास तीन हजारांच्या आसपास कर्मचारी या एकटय़ा वर्कशॉपमध्ये काम करत असून हा वर्कशॉपचा परिसर जवळपास दीड किलोमीटरच्या परिसरात पसरला आहे.