निवडणुकीत तोंडावर आपटलेल्या भाजपच्या मित्रपक्षांनी सत्तेत मंत्रिपदाचे लोणी खाण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मित्रपक्षांचे नेते बुधवारी मुंबईमध्ये बैठक करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चार मित्रपक्षांपैकी केवळ राष्ट्रीय समाज पक्षाचा एक उमेदवार निवडून आला आहे. उर्वरित सर्व मित्रपक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही.
रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष आणि विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना यांना सोबत घेऊन भाजपने निवडणूक लढविली होती. यापैकी केवळ रासपचा एक उमेदवार पुणे जिल्ह्यातील दौड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाला. राहुल कुल यांना रासपच्या तिकीटीवर या मतदारसंघातून यश मिळाले. आत्ता या एकाच आमदाराच्या जोरावर रासपने राज्यात कॅबिनेट मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिल्यास पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे स्वतःच मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत. मात्र, भाजपने कॅबिनेटऐवजी राज्यमंत्रीपद देऊ केल्यास राहुल कुल यांना मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राजू शेट्टी यांनीही आपल्याला सत्तेमध्ये वाटा देण्याची मागणी केली आहे. निवडणुकीत त्यांनी १३ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. या स्थितीत केवळ निवडणुकीपूर्वी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांच्याकडून मंत्रिपदाची अपेक्षा केली जात आहे. भाजपने त्यांच्या पक्षाला मंत्रिपद दिले तर सदाभाऊ खोत यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप आम्हाला कोणते मंत्रिपद देते, हे बघूनच आम्ही निर्णय घेऊ असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनीही कॅबिनेट मंत्रिपद देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. त्यांच्या पक्षाचाही एकही उमेदवार निवडणुकीत यशस्वी ठरला नव्हता. तरीही निवडणुकीपूर्वीच्या युतीमुळेच त्यांनीही मंत्रिपदावर दावेदारी केली आहे.