मुंबई:  मुंबई शहर व उपनगरातील ३८ ठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिरातील घुसखोरी रोखण्यात सरकार हतबल आहे. म्हाडा अधिकारी आणि दलाल यांच्यातील संगनमताने ही घुसखोरी होते. मात्र यापुढे एकही घुसखोर आढळून आल्यास संबंधित भाडेवसुली अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल. या घुसखोरीची उच्चस्तरीय चौकशी करतानाच बेकायदेशीर घुसलेल्यांना तीन महिन्यांत हुसकावून बाहेर काढले जाईल, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिन पटेल, अतुल भातखळकर आदींनी मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास तसेच संक्रमण शिबिरातील घुसखोरीबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान आव्हाड बोलत होते. शहरात म्हाडाची बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, विक्रोळी, कांदिवली, कुलाबा, सायन, कफ परेड, धारावी अशा ३८ ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. या संक्रमण शिबिरातील घुसखोरी सरकारसाठी  प्रश्न झाला असून घुसखोरी रोखण्यात सरकार हतबल असल्याची कबुली आव्हाड यांनी दिली. ही शिबिरे दलालांच्या ताब्यात गेली असून त्याला विभागातील अधिकारी विशेषत: भाडेवसुली अधिकारी जबाबदार असल्याचे सांगत या घुसखोरीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली. सर्व संक्रमण शिबिराच्या ठिकाणी दलालांची नावे प्रसिद्ध केली जाणार असून लोकांनी घरे घेऊ नयेत, असे आवाहन केले जाईल. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 कामाठीपुऱ्याचा तीन महिन्यांत पुनर्विकास  कामाठीपुरा क्षेत्रातील २२ एकर जागेवरील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या ठिकाणी ८ हजार ३२८ कुटुंबे राहत असून या क्षेत्रातील नागरी सुविधा व इतर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात येणार असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. तीन महिन्यांत या पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही आव्हाड यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Failure prevent intruders transit camps confession home minister action responsible mhada officials ysh
Show comments