लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: राज्यातील नागरिकांमधील वाढता लठ्ठपणा, मुख शुद्धीकरण व स्वच्छता, मोतीबिंदू आणि महिलांमधील स्तन कर्करोग, थायरॉईडचे वाढते प्रमाण लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण विभागाने वर्षाच्या सुरुवातील सात विविध उपक्रम हाती घेतले असून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात काही अंशी अपयश आले आहे. ही बाब लक्षात घेऊन हे उपक्रम प्रभावीपणे राबिवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले आहेत. त्याअनुषगांने शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने वर्षाच्या सुरुवातील स्तन कर्करोग, मुख शुद्धीकरण व स्वच्छता, लठ्ठपणा, अवयवदान, रक्तदान, कंठग्रथी (थायरॉईड) याबाबत हाती घेतलेल्या उपक्रमांच्या कामगिरीचा आढावा राजीव निवतकर यांनी नुकताच ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून घेतला. या उपक्रमांच्या माध्यमातून अपेक्षेनुसार नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी समन्वयकांना केल्या. शिबिरांचे आयोजन करण्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये जाऊन या योजना राबविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आणखी वाचा-मुंबई: मुलभूत सोयी सुविधांसाठी गोराई, मनोरीवासियांचे आंदोलन

स्तन कर्करोग जनजागृती आणि उपचार या उपक्रमांतर्गत जूनमध्ये ग्रामीण भागामध्ये दोन – तीन आठवड्यांमध्ये मोहीम राबवावी, महिलांमध्ये थायरॉईड आणि स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याने हे दोन्ही उपक्रम एकत्रित राबवावेत, तसेच सर्व संशयित रुग्णांची थायरॉईड चाचणी करावी, त्यासाठी रक्ताचे नमूने संकलित करण्याच्या सूचना उपक्रम प्रमुखांनी स्थानिक स्तरावर कराव्यात, असे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले.

राज्यातील शहर व ग्रामीण भागांमध्ये जूनमध्ये लठ्ठपणाविषयक मोहीम राबवावी. यासंदर्भातील मार्गदर्शकतत्त्वे संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच पाठविण्यात येतील. नियोजनानुसार ही मोहीम राबवावी. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. अवयवदान आणि मौखिक आरोग्य उपक्रम ठरलेल्या कार्यक्रमानुसार राबविण्यात यावे, तसेच ऑस्टोपोरोसिस अभियानाचे अनावरण आंतरराष्ट्रीय स्कोलियोसिस दिनी करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.