मुंबई : फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आतापर्यंत ३४४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. याप्रकरणी ईडीने बुधवारी आठ कोटी ३७ लाख रुपयांच्या मामत्तेवर टाच आणली होती. आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या बेकायदा प्रक्षेपणाप्रकरणी ईडी तपास करीत आहे. तसेच आयपीएल प्रसारणासह फेअर प्ले ॲपद्वारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी फेअर प्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार वायकॉम १८ नेटवर्क कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअर प्ले ॲपवर बेकायदेशीररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. पण फेअर प्ले ॲपवर सामान्यांचे बेकायदा प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सुमारे ४० चित्रपट कलाकारांनी या ॲपची जाहिरात केली. त्यामुळे डिजिटल स्वामित्त्व हक्कचा भंग झाल्याची तक्रार वायकॉम १८ ने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणाच्या आधारावर ईडीनेही तपासाला सुरूवात केली होती.

हेही वाचा – मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश

फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ येथील विदेशी संस्थांमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संस्थांसोबत करार केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच भारतीय संस्थांनी, कंपन्यांनी फेअर प्लेच्या जाहिरातीसाठी करार अंमलात आणण्यापूर्वी त्याबाबत कोणतीही योग्य काळजी घेतली नाही.

फेअर प्लेने विविध बनावट कागदपत्राद्वारे उघडलेल्या बँक खात्यांद्वारे निधी गोळा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच बनावट बँक खात्यातील रकमेचा वापर करून ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करण्यात आले. त्यासाठी औषध कंपन्यांच्या पावत्यांचा वापर करण्यात आला. हा निधी हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील परदेशी बनावट कंपन्यांना पाठवण्यात आला आहे. त्यासाठी ४०० हून अधिक बँक खात्यांचा वापर करण्यात आला.

ईडीच्या तपासानुसार, मे बेफी फिनसर्व प्रा. लि. व मे. ट्रू फंड इनोव्हेशन इंडिया प्रा. लि. यांनी फेअर प्ले वापरकर्त्यांसाठी बेकायदेशीर पेआउट सेवा पुरवल्या. फेअर प्लेच्या वापरकर्त्यांकडून निधी गोळा करण्यात आला, तो बनावट बँक खाती आणि मध्यस्थी बँक खाती वापरून फेरफार आणि वितरीत करण्यात आला. त्यानंतर हा निधी मे ट्रू फंड इनोव्हेशन इंडिया प्रा. लि. आणि मे बेफी फिनसर्व प्रा. लिच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. त्याचा वापर फेअर प्ले वापरकर्त्यांना बेकायदेशीररित्या पेआउट्स देण्यासाठी करण्यात आला. या बेकायदेशीर सेवांसाठी सदर कंपन्यांना कमिशन प्राप्त झाले, जे संचालकांनी स्वत:च्या आणि संबंधित व्यक्ती / संस्थांच्या नावाने स्थावर मालमत्ता खरेदीसाठी वापरले.

हेही वाचा – तुटपुंजी भरपाई देण्याएवढा माणसाचा जीव स्वस्त नाही – उच्च न्यायालय

ईडीने गेल्यावर्षी १२ जून, २७ सप्टेंबर व २५ ऑक्टोबरला शोधमोहीम राबवली होती. यामध्ये विविध मालमत्ता जप्त / गोठविण्यात आल्या. १५ जानेवारीला याप्रकरणी ईडीने आठ कोटी ३७ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. त्यामुळे याप्रकरणात टाच आणण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत ३४४ कोटी १५ लाख रुपये झाल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fair play betting app case ed seizes rs 344 crore assets so far mumbai print news ssb