मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याचे बनावट नियुक्तीपत्र तयार केल्या प्रकरणी राजू वैष्णव नावाच्या व्यक्तीविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट लेटरहेडचा वापर करण्यात आला होता. समाज माध्यमांवर हे पत्र प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. आरोपी नालासोपारा येथील रहिवासी असून त्याच्या शोधासाठी पथक नालासोपारा परिसरात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातील पदाधिकारी मुकुंद कुलकर्णी (६१) यांनी याबाबत तक्रारी केली होती. त्यानुसार मरिन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी बनावट कागदपत्र तयार करणे, बनावट कागदपत्राद्वारे दिशाभूल केल्याप्रकरणी राजू वैष्णव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या बनावट लेटरहेडचा वापर केला. त्या माध्यमातून राजू वैष्णव याची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केल्याचे पत्र तयार करण्यात आले. पण समाज माध्यमांवर ते पत्र प्रसारित होताच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
वैष्णव याला समाज माध्यमांवर अनेकजण शुभेच्छा देऊ लागले. स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे विचारणा केली. पण अशी कोणतीही नियुक्ती प्रदेश कार्यालयातून करण्यात आली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे याप्रकरणी प्रदेश कार्यालयाकडून मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीची माहिती मिळाल्यानंतर एक पथक आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आले. पण अद्याप तो हाती लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीच्या चौकशीनंतर हा प्रकार का करण्यात आला, ते स्पष्ट होऊ शकेल. तसेच आरोपीने स्वतः हे नियुक्तीपत्र तयार केले की त्याला कोणी बनवून दिले, ही बाबही चौकशीनंतर स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.