व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सराईत गुन्हेगाराचा हात
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनुसूचित जमातीच्या नावाने खोटी जात प्रमाणपत्रे बनवून नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमधील राखीव जागांवर डल्ला मारण्याचे रॅकेट गेल्या चार-सहा वर्षांतील नसून २००१पासून कार्यरत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. गेल्या १६ वर्षांत अशा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे हजारो विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंता, व्यवस्थापकाची पदवी पदरात पाडून घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र या रॅकेटचा सूत्रधार एक बडा डॉक्टर असून २००१ सालीच त्याच्यावर बनावट जात प्रमाणपत्रांबाबतचे गुन्हे दाखल झाल्याचे समोर येत आहे. मात्र तो सध्या फरार असल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
केवळ वैद्यकीयच नव्हे तर एमबीए, अभियांत्रिकी अशा अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांध्ये हजारो विद्यार्थ्यांनी खोटय़ा प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतले आहेत. यासाठी त्या डॉक्टरने प्रत्येकी ५ ते २० लाखांपर्यंत पैसे घेतल्याचे समजते आहे. या बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे या डॉक्टरने कोटय़वधींची माया कमावल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस या डॉक्टरच्या मागावर आहेत.
वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना खोटी जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा भांडाफोड ‘लोकसत्ता’ने केला होता. यात नऊ विद्यार्थी हे एकटय़ा जे. जे. महाविद्यालयाचे आहेत. जे. जे. मार्ग ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ५ विद्यार्थ्यांना अटकही केली होती. त्यानंतर याच महाविद्यालयातील प्राध्यापक व डॉ. आरिफ रेशमवाला (वय ६२) या डॉक्टरचाही या प्रकरणातील सहभाग उघड झाला होता. १९७२ साली त्याने एमबीबीएसला प्रवेश घेताना ओबीसीचे जात प्रमाणपत्रावर दाखवले होते. मात्र त्याची दोन मुले व पुतण्या यांनी एमबीबीएसला प्रवेश घेताना एसटी प्रवर्गाचे बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र दाखवून प्रवेश घेतला.
सुरुवातीला हा रेशमवालाच ही बनावट प्रमाणपत्रे बनवून देत असावा असा संशय होता. कारण इतर विद्यार्थ्यांनीही चौकशीत त्याचेच नाव सांगितले होते. मात्र हा रेशमवाला या प्रकरणातील मुख्य आरोपी नसून यामागे एक दुसराच बडा डॉक्टर सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांच्या रडारवर असलेल्या या मुख्य आरोपीवर यापूर्वी २००१ साली माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात आणि २००८ साली मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात बनावट प्रमाणपत्र बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच तो हेही धंदे करतो. त्याने २००१ ते २०१६ या काळात अशा हजारो जणांना बनावट जात प्रमाणपत्र बनवून दिली आहेत. या प्रत्येक प्रमाणपत्रासाठी त्याने ५ लाखांपासून २० लाखांवर पैसे उकळले असल्याने स्पष्ट होत आहे. आतापर्यंत त्याचा किमान १० वेळा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र जामिनावर मुक्तता होत असल्याने हा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणी आझाद मैदान, मरिन ड्राइव्ह पोलिसांतही गुन्हे दाखल आहेत.
- महाराष्ट्रात उस्मानाबाद, नंदुरबार आदी जिल्ह्य़ांतील जात पडताळणी समित्यांच्या बनावट सही-शिक्क्यांची खोटी प्रमाणपत्रे त्याने आजवर बनवून दिली आहेत. त्याचा मागोवा घेण्यात पोलिसांना यश आल्यास त्याच्याकडून खोटय़ा जात प्रमाणपत्राआधारे प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नावे उघड होणार आहेत.