गेल्या काही दिवसांपासून पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असून ताडदेव परिसरात केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) तोतया अधिकाऱ्यांनी ७० वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने तक्रारदाराचा विश्वास संपादन करून त्याच्या बॅगमधील १० लाख रुपयांची रोख रक्कम लुटून पोबारा केला. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>>कारवाईला सुरुवाला… मराठी फलक नसल्याने मुंबईत ५२२ दुकानदारांना नोटीस

नवी मुंबई येथील रहिवासी विजय तुसलीदास गांधी (७०) मंगळवारी ताडदेव येथील ३५१ क्रमांकाच्या बस थांब्या जवळील अंग्रेजी ढाब्यासमोर उभे होते. त्यावेळी दोन व्यक्ती मोटरसायकलवरून त्यांच्या जवळ आल्या. आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे त्यांनी गांधी यांना सांगितले. सध्या ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत असून तुम्ही अशी बॅग घेऊन जात असल्याचे पाहून कोणीही तुम्हाला लुटू शकते, असेही त्यांनी गांधी यांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या गांधी यांना आरोपींनी बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील बॅग देण्यास भाग पाडले. गांधी यांनी बॅग दिल्यानंतर आरोपीने हातचलाखीने त्यातील रोख रक्कम लुटून पोबारा केला.

हेही वाचा >>>मुंबई : कोकणातील मच्छिमारांना एक लाख रुपये नुकसान भरपाई

बॅगेतील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर गांधी यांनी याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपलब्ध सीसी टीव्ही कॅमेरामध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. सीसी टीव्ही कॅमेरात लाल रंगाचे शर्ट घातलेला एक आरोपी गांधी यांच्या जवळ येताना दिसत आहे. त्याच्या साथीदाराने चौकटीचा पांढरा शर्ट घातला आहे. आरोपींना गांधी यांच्या बॅगेत रोख रक्कम असल्याची माहिती असल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.