विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्याच्याबदल्यात विविध शिक्षण संस्थांची बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. विनयकुमार मेंगी (४६) आणि मनीष घाटबांदे (३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते मीरा रोड येथील रहिवासी आहेत.
कोणतीही परीक्षा न घेता विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना बोगस प्रमाणपत्र देण्याचा व्यवसाय मीरा रोड येथील स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशनमध्ये सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने छापा टाकला असता त्यांना विविध संस्थांची बोगस प्रमाणपत्रे आढळली. यात स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशनची ३०५ कोरी प्रमाणपत्रे, २७० गुणपत्रिका, तसेच विनायक मिशन युनिव्हर्सिटी सालेम तामीळनाडू, इंडियाची २६० प्रमाणपत्रे, सरस्वती शिक्षा परिषद, महाराष्ट्रच्या २५ गुणपत्रिका, मदुराई कानराज युनिव्हर्सिटी, तामिळनाडूची १२ प्रमाणपत्रे आणि रॉयल हायर एज्युकेशन सोसायटी, मीरा रोडची ९ प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे. ही सर्व बोगस प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले ४ संगणक तसेच प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, स्कॅनर हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, या आरोपींना न्यायालयात सादर केले असता त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.